20 September 2020

News Flash

जैतापूर, भूमिअधिग्रहणास शिवसेनेचा विरोध योग्यच – डॉ. अमोल कोल्हे

जैतापूरमुळे अवघी १३ टक्के वीज महाराष्ट्राच्या वाटय़ाला मिळणार आहे, त्यासाठी १०० टक्के धोका का पत्करावा? भूमिअधिग्रहण कायद्याला विरोध शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे.

| May 28, 2015 03:07 am

जैतापूर अणुप्रकल्पामुळे कोकणची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल आणि भूमिअधिग्रहण कायद्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून उद्योगपतींचे उखळ पांढरे होईल, म्हणूनच शिवसेनेचा विरोध आहे. सत्तेत असलो तरी जनहिताच्या कामांचा विचार प्राधान्याने केला जाईल, हीच शिवसेनेची भूमिका राहील, असे संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी आकुर्डीत बोलताना स्पष्ट केले. तरूणांनी सकारात्मक दृष्टी ठेवून राजकारणात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दिशा फाउंडेशन आयोजित निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या सूत्रसंचालन कार्यशाळेत डॉ. कोल्हेंची मुलाखत घेण्यात आली, तेव्हा ते बोलत होते. प्राचार्य नितीन घोरपडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
डॉ. कोल्हे म्हणाले, ‘जैतापूर अणुप्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे, इतकेच सांगितले जाते. मात्र, शास्त्रीयदृष्टय़ा मांडलेल्या कारणांचा ऊहापोह होत नाही. या प्रकल्पामुळे होऊ शकणारे दुष्परिणाम पाहिले जात नाहीत. जैतापूरमुळे अवघी १३ टक्के वीज महाराष्ट्राच्या वाटय़ाला मिळणार आहे, त्यासाठी १०० टक्के धोका का पत्करावा? भूमिअधिग्रहण कायद्याला विरोध शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. प्रकल्पांसाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत किती जणांचे पुनर्वसन झाले, हा संशोधनाचा विषय आहे. प्रसार माध्यमांनी वस्तुस्थिती मांडणारे वार्ताकन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारताचे भवितव्य तरूणाईच्या हातात आहे. तरूणाईत असलेली रग विधायक कार्यासाठी वापरली पाहिजे. राजकारणात येण्याची सर्वच पक्षांकडून ‘ऑफर’ होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचे सुसंस्कृत नेतृत्व भावले म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. सेनानेतृत्वाशी थेट संवाद साधता येतो, मध्यस्थाची गरज पडत नाही.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2015 3:07 am

Web Title: shivsena will oppose jaitapur atomic energy project
Next Stories
1 यंदाचा बालगंधर्व पुरस्कार डॉ. क्षमा वैद्य यांना जाहीर
2 दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्रे जाहीर
3 बारावी निकाल : कोकण अव्वल, नाशिक, मुंबई तळात
Just Now!
X