माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कारभारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद 18patreबहुमत असलेल्या पिंपरी पालिकेतील विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाला. शिवसेनेचे राम पात्रे १३०० हून अधिक मतांनी विजयी झाले. काँग्रेस उमेदवाराने अनपेक्षितपणे दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. भाजपला तिसऱ्या तर राष्ट्रवादीवर चौथ्या क्रमांकावर फेकले जाण्याची नामुष्की ओढावली. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर बालेकिल्ल्यातच पराभूत व्हावे लागल्याने अजितदादांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचे पद रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीविषयी अनास्था आणि कडक उन्हाचा तडाखा असूनही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे अधिकाधिक मतदार मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळेच अनपेक्षितपणे ५१ टक्के मतदान होऊ शकले. या वाढलेल्या मतदानाचा थेट फायदा शिवसेनेला झाला. एकूण झालेल्या मतदानापैकी जवळपास निम्मी मते पात्रे यांना मिळाली आहेत. माजी खासदार गजानन बाबर यांचे राम पात्रे हे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. बाबर व शिवसेनेचे सध्याचे संबंध अतिशय ताणलेले असतानाही पात्रे यांना शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिली व त्यांच्यासाठी पूर्णपणे ताकदही लावली. गटतट व मतभेद विसरून शिवसैनिकांनी काम केले. राष्ट्रवादीच्या एका गटाने शिवसेनेच्या सोयीची भूमिका घेतली. शिवसेनेला पुढे चाल (बाय) दिल्याची कुणकुण अजितदादांना लागली होती. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा उमेदवारजिंकला पाहिजे, अशी तंबी त्यांनी स्थानिक नेत्यांना दिली. मात्र, तरीही शिवसेनेशी राष्ट्रवादीचे संगनमत कायम राहिले. त्याचा परिणाम शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला व त्यासाठी राष्ट्रवादीचाच हातभार लागला. थेट चौथ्या क्रमाकांवर फेकले गेल्याने राष्ट्रवादीची दारूण अवस्था झाली. यानिमित्ताने भाजपच्याही मर्यादा स्पष्ट झाल्या. २०१७ मध्ये पालिकाजिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला मोहननगर पाठोपाठ विद्यानगर पोटनिवडणुकीत जोरदार झटका बसला. याही वेळी भाजपला तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले. मोहननगर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार िरगणात नव्हता, त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला होता. मात्र, विद्यानगरमध्ये काँग्रेस उमेदवाराने घेतलेल्या भरघोस मतांचा फटका राष्ट्रवादीलाच बसला. काँग्रेसचा एक मोठा व राष्ट्रवादीधार्जिणा गट प्रचाराकडे फिरकला नाही, तरीही काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. शेट्टी यांच्याविषयी असलेली तीव्र नाराजी राष्ट्रवादीला भोवली. राम पात्रे यांच्याविषयी असलेली सहानुभूती मतपेटीत उतरली.

राम पात्रे (शिवसेना) – २४०२ (विजयी)
सतीश भोसले (काँग्रेस) – १०२३
भीमा बोबडे (भाजप) – ९५९
दत्तू मोरे (राष्ट्रवादी) – ५८०
शारदा बनसोडे (भारिप) – १०४
नोटा – १४१