22 April 2019

News Flash

एसटी शिवशाही शयनयान गाडीच्या भाडेदरांमध्ये कपात

प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात नव्या मार्गावर शयनयान बस सुरू करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

पुणे : राज्य परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही शयनयान या गाडीच्या तिकीट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. नवे दर १३ फेब्रुवारीपासून लागू केले जाणार आहेत. २३० ते ५०५ रुपयांपर्यंत ही कपात असणार आहे.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खासगी वाहतुकीशी स्पर्धा त्याचप्रमाणे लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखकर आणि माफक दरामध्ये व्हावा, या उद्देशाने ही कपात करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. एसटी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरातील कपातीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविला होता. महामंडळाकडून राज्यातील ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. कमी होणाऱ्या तिकीट दरांमुळे खासगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत जास्त प्रवासी वाढविण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.

प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात नव्या मार्गावर शयनयान बस सुरू करण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. वातानुकूलित शिवशाही शयनयान गाडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वीच तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत देण्यात आली आहे. दरकपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिकांनाही होणार आहे.

प्रवाशांनी सुरक्षित आणि किफायतशीर शयनयान प्रवासासाठी एसटीच्या वातानुकूलित शयनयान बसचा वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या मार्गावरील शिवशाहीचे नवे भाडे

          मार्ग                            जुने भाडे       नवे भाडे

मुंबई-औरंगाबाद                        १०८५          ८१०

मुंबई- बीड                                 १०८५            ८१०

मुंबई-रत्नागिरी                        ९५५                ७१५

बोरिवली- कोल्हापूर                    १०२०             ७६०

पुणे- नागपूर                              १९९०             १४८५

पुणे- अमरावती                         १५९५             ११९०

पुणे- जळगाव                            १०५०             ७८५

शिवाजीनगर- यवतमाळ         १६१०               १२००

नाशिक- सोलापूर                     १०८५               ८१०

नाशिक- अहमदाबाद              १४००                १०४५

नाशिक-कोल्हापूर                    ११९५                ८९०

First Published on February 9, 2019 3:02 am

Web Title: shivshahi bus fare st shivshahi sleeper bus fare reduced