पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना काल करोनाची बाधा झाल्याचे निष्पण्ण झाले होते. त्यानंतर आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एक-दोन नव्हे आठ सदस्यांना करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटर हँडलवरुन आपला करोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले होते.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह १३ जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांची तब्येत ठणठणीत आहे. तसेच महापौरांचे कार्यालय आणि निवासस्थानी त्यांच्या संपर्कात आलेल्या २५ ते ३० जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्या सर्वांचे चाचणी अहवाल लवकरच येतील, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

महापौरांनी ट्विटवर म्हटले, “थोडासा ताप आल्याने मी करोनाची चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.”

दरम्यान, पुण्यातील भाजपाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही करोनाची बाधा झाल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट झाले. त्यांनीही ट्विटद्वारे आपला चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले. “दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची करोनाची तपासणी करून घेतली असताना हा अहवाल पॉझिटिव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे,” असे ट्विट त्यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचा देखील काल करोनामुळे मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पहिल्यांदा करोना विषाणूची सौम्य लक्षण होती. मात्र, त्यांनानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.