पुण्यातील येवलेवाडी भागातील गणेश ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात दुकानातील कामगार जखमी झाला आहे. ही घटना आज (बुधवार) दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. घटनास्थळी कोंढवा पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेमुळे कोंढवा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमृत परिहार (वय २७) असे जखमी कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथे आज दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास गणेश ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी चार अज्ञात व्यक्ती आले होते. त्या दरम्यान दुकानातील कामगार अमृत परिहारने आरडाओरडा केली. त्यावेळी त्या चौघांपैकी एकाने त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये तो जखमी झाला आहे. जखमी तरुणास जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.