दिवाळीला विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पुणेकर मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडल्याने शनिवारी बाजारपेठा अक्षरश: हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र होते. वाहनेही मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर आल्याने शहराच्या विविध भागामध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. रात्रीपर्यंत नागरिकांची गर्दी व वाहतुकीची कोंडी कायम होती.
दिवाळीच्या निमित्ताने कपडे, दागिने खरेदीबरोबरच सजावटीच्या व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक शनिवारी मोठय़ा प्रमाणावर बाहेर निघाले होते. त्यामुळे प्रमुख बाजारपेठ असलेल्या शहरातील विविध भागात व उपनगरांमध्येही रस्त्यांवर नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, डेक्कन, टिळक रस्ता, फग्र्युसन रस्ता, शहरातील मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच नागरिकांची खरेदी सुरू होती. संध्याकाळनंतर गर्दीत वाढ होत गेली. तयार कपडय़ांची दुकाने, मोबाईल शॉपी, सजावटीच्या वस्तू मिळणाऱ्या दुकानांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
खरेदीच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांची वाहनांमुळे रस्त्यावर असणाऱ्या रोजच्या वाहतुकीत भर पडल्याने खरेदीच्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. संध्याकाळनंतर गर्दी वाढल्याने या कोंडीमध्ये आणखी  भर पडली.