प्रतिबंधित भाग वगळला

पुणे: महापालिकेने शहरातील प्रतिबंधित भाग वगळता अन्य भागात दिवसाआड विविध व्यावासायिकांना दुकाने खुली ठेवण्याची मुभा मंगळवारी रात्री आदेशाद्वारे दिली. त्यानुसार शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने खुली ठेवावीत, असे आवाहन पुणे व्यापारी महासंघाकडून करण्यात आले आहे.

पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दुकाने उघडण्यास हरकत नसल्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या बैठकीस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पितळीया म्हणाले,की महापालिकेने मंगळवारी रात्री आदेश दिल्यानंतर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ऑनलाइन पद्धतीने पार पडली.

या बैठकीत महापालिकेच्या आदेशानुसार तसेच ठरवून दिलेल्या वारांनुसार दुकाने खुली ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुकाने खुली ठेवण्याचे आवाहन व्यापारी बांधवांना करण्यात आले आहे.

पुणे व्यापारी महासंघाशी शहरातील ८२ व्यापारी संघटना संलग्नित आहेत. त्यात विविध व्यवसायांचा समावेश आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला व्यापारी महासंघाने प्रतिसाद दिला तसेच सकारात्मक भूमिका घेतली. गेले दोन महिने शहरातील व्यावसायिकांनी त्यांची दुकाने बंद ठेवली. दुकाने बंद ठेवण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले तसेच कामगार वर्गाला त्याची झळ पोचली. महापालिकेच्या आदेशानंतर दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, असे पितळीया यांनी सांगितले.

व्यवहार करताना काळजी घेण्याचे आवाहन

शहरात चाळीस हजार दुकाने आहेत. शहराच्या ज्या भागात दुकाने खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे, त्या भागातील व्यापारी बांधव तसेच कामगार वर्गाने स्वत:ची काळजी घ्यावी.  दुकानाचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे. मुखपट्टी तसेच जंतुनाशकांचा वापर करावा, असे आवाहन पुणे व्यापारी महासंघाकडून करण्यात आले आहे.

काही दुकाने खुली

शहरातील व्यापारी पेठातील सर्व व्यावसायिकांची दुकाने बंद आहेत. रविवार पेठ, बोहरी आळी, भवानी पेठेतील भुसार बाजार प्रतिबंधित भागात येतो. त्यामुळे तेथील दुकाने बंदच आहेत. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता परिसरातील अनेक दुकाने बंद होती. किराणा माल, किरकोळ विक्रेते, औषध विक्रीची दुकाने, दूध डेअरी सुरू असल्याचे पाहायला मिळाले. पादत्राणे विक्रेते तसेच अन्य व्यावसायिकांनी सकाळी दुकाने उघडली. दुपापर्यंत दुकाने सुरू होती. मात्र, खरेदीसाठी फारशी गर्दी झाली नव्हती. व्यवहार सुरळीत होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.