पुणे : करोनामुळे पुणे व्यापारी महासंघाकडून गुरुवापर्यंत (१९ मार्च) व्यापार बंद ठेवण्यात येणार असल्याने शहरातील व्यापारी पेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. औषधे, किराणामाल विक्रेते वगळून बहुतांश व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवले.

करोनामुळे पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवार (१७ मार्च) ते गुरुवापर्यंत (१९ मार्च) व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील घाऊक तसेच किरकोळ व्यापाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरातील चाळीस हजार दुकाने  बंद राहणार आहेत. शहरातील व्यापाऱ्यांनी बंद ठेवला असला तरी उपनगरात मात्र सर्वत्र व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते.

शहरातील रविवार पेठ, बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, शनिपार,अप्पा बळवंत चौक, फडके हौद चौक, भवानी पेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने नेहमी गजबजलेल्या या भागात शुकशुकाट पाहायला मिळाला.

दरम्यान, मार्केटयार्डातील भाजीपाला, फळे तसेच भुसार बाजारातील मालाचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये होत असल्याने तेथील बाजाराचे कामकाज नियमितपणे सुरू होते.

पुणेकरांच्या निरोगीपणासाठीच निर्णय

शहरात ३५ ते ४० हजार छोटे-मोठे व्यापारी असून सुमारे ७० ते ८० हजार कामगार, सेवकवर्ग या दुकानातून काम करतात. पुणेकरांना करोना विषाणूचा संसर्ग होऊ  नये या उद्देशातून स्वत:च्या आर्थिक नुकसानीपेक्षा पुणेकरांच्या जीवाची काळजी घेणे ही भावना व्यापारी वर्गाच्या मनात आहे. त्यामुळे तीन दिवस बंदचा निर्णय पुणेकर निरोगी रहाण्यासाठी घेण्यात आला आहे, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले. पुणे व्यापारी महासंघाच्या गुरुवारी (१९ मार्च) होणाऱ्या कार्यकारिणी सभेत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.