News Flash

उपनगरांतील दुकाने रात्रीपर्यंत सुरू

करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही प्रशासनाकडून कानाडोळा

करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही प्रशासनाकडून कानाडोळा

पुणे : उपनगरात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना या भागातील दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात. महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा दिलेली असताना उपनगरातील दुकानदार प्रशासनाचा आदेश धुडकावून रात्रीपर्यंत व्यवसाय करत आहेत. महापालिका आणि पोलिसांकडून रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत.

शहराच्या मध्य भागातील करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे निरीक्षण महापालिका प्रशासनाने व्यक्त केले आहे. मध्य भागातील पेठांच्या तुलनेत वडगाव धायरी, धनकवडी, बालाजीनगर, सुखसागरनगर, बिबवेवाडी, कात्रज, वारजे, उत्तमनगर परिसरात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तसेच पार्सल सेवा देणारी उपाहारगृहे सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र उपनगरातील दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतात. करोनाबाधितांची संख्या, दुकानांच्या परिसरात होणाऱ्या गर्दीकडे प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत असल्याची माहिती  बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागातील नागरिकांकडून देण्यात आली.

दुकाने सायंकाळपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आलेली असताना प्रशासनाचा आदेश धुडकावून  उपनगरातील व्यापारी दुकाने सुरू  ठेवत आहेत. उपनगरातील दुकानांवर कारवाई देखील करण्यात येत नाही. अनेक ठिकाणी करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी पुरेशी काळजी घेतली जात नाही, तसेच सामाजिक अंतरही पाळले जात नाही. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दुकानांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, अशी माहिती काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

करोनामुळे प्रत्येकावर निर्बंध आहेत. प्रत्येकाने जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करायला हवे. संसर्गाला अटकाव घालण्यासाठी काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. नियमांचे पालन न केल्यास किंवा दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

– डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त, पुणे पोलीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 1:28 am

Web Title: shops in the pune suburbs open til late at night zws 70
Next Stories
1 रुग्णालये, दवाखाने नावालाच
2 २३ हजार नागरिक करोनामुक्त
3 डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयितांचे जामीन अर्ज पुन्हा फेटाळले
Just Now!
X