तीन महिन्यानंतर व्यापारी पेठेत लगबग

पुणे : करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर प्रतिबंधित भागात येत असलेल्या व्यापारी पेठेतील दुकाने बंद होती. अखेर मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाने व्यापारी पेठेतील दुकाने सुरु करण्याची मुभा दिली. बुधवारी (१७ जून) व्यापारी पेठेतील दुकाने तीन महिन्यानंतर उघडण्यात आली. दुकाने उघडण्यात आल्यानंतर व्यापारी पेठेतील मरगळीचे वातावरण दूर झाल्याचे पाहायला मिळाले. प्रतिबंधित भागातील अडथळे मध्यरात्रीनंतर काढून टाकण्यात आले.

या भागातील व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. पुणे शहर व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांसाठी नियमावली जाहीर केली असून नियमावलीचे पालन यापुढील काळात काटेकोरपणे करावे लागणार आहे. व्यापारी बांधवांकडून करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या जात आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीकडून व्यापारी पेठेत नियमित पाहणी करण्यात येणार आहे. नियमांचे पालन न केल्यास व्यापाऱ्यांवर या समितीकडून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.

प्रत्येक दुकानात ऑक्सी मीटरची व्यवस्था करावी. दुकानात प्रवेश करणारा कर्मचारी वर्ग आणि ग्राहकांचे ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करावी. ऑक्सिजनची पातळी ९० पेक्षा कमी असल्यास तसेच पल्स रेट ६५ पेक्षा कमी असल्यास प्रवेश नाकारण्यात यावा. दुकानात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाची तापमापकाद्वारे तपासणी करण्यात यावी. दुकानात प्रवेश करताना प्रत्येकाने जंतुनाशकाचा वापर करावा. पुढील आदेश येईपर्यंत कर्मचारी वर्गाने दुकानात येणे-जाण्याची वेळ, जेवणाची वेळ, चहापानाच्या वेळेची नोंद करावी. दुकानात असलेले थंब मशिन सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवावे. दुकानात मुखपट्टी आणि हातमोजे घालून कर्मचारी वर्गाला प्रवेश द्यावा. दुकानातील प्रत्येक भाग दररोज स्वच्छ करण्यात यावा. दुकानात असलेल्या कर्मचारी वर्गाने आळीपाळीने थांबावे. शक्यतो प्रत्येकाने एकमेकांपासून अंतर राखावे, असे नियमावलीत म्हटले आहे. दुकानातील कर्मचारी वर्गाने कामावरुन घरी गेल्यावर अंघोळ करावी. दररोज धुतलेले कपडे परिधान करावेत. कामावर येताना घरूनच डबा आणावा. जेवणासाठी एकत्र बसू नये. प्रत्येकाने अंतर ठेवाव, असेही नियमावलीत म्हटले आहे.

ग्राहकांची काळजी घ्यावी

प्रत्येक ग्राहकाने मुखपट्टी, हातमोजे परिधान केलेत का नाही, याची पाहणी करावी. एखाद्या ग्राहकाने मुखपट्टी किंवा हातमोजे परिधान न केल्यास त्याला त्वरित दुकानातून मुखपट्टी, हातमोजे देण्यात यावेत. ग्राहकांना गर्दी करू देऊ नये. याबाबतच्या सूचना ग्राहकांना देण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अडथळे हटले

शहरातील नाना-भवानी पेठ, टिंबर मार्केट, शंकरशेठ रस्ता, गणेश पेठ, नेहरू चौक, गुरुवार पेठेतील भांडे आळी, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके हौद चौक, रास्ता पेठ, नेहरू रस्ता भागाचा समावेश व्यापारी पेठेत होतो. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर या भागातील इलेक्ट्रॉनिक, लोखंडी साहित्य, प्लायवुड, स्टेनलीस स्टील तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मध्यरात्रीनंतर या भागातील अडथळे हटविण्यात आले. अडथळे हटवण्यात आले असले तरी व्यापारी पेठेलगतच्या सूक्ष्म प्रतिबंधित भागातील अडथळे कायम ठेवण्यात आले आहेत.