उन्हाळी सुट्टय़ांमध्ये रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याचा फटका ‘आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’लाही (एएफएमसी) बसला आहे. सध्या ‘एएफएमसी’मध्ये ‘ए’ व ‘बी’- पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रक्ताचा मोठा तुटवडा जाणवतो आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात सुट्टय़ा आणि चढे तापमान या दोन्हीमुळे रक्तदान शिबिरे होत नाहीत आणि जवळपास सर्व रक्तपेढय़ांना रक्ताच्या तुटवडय़ाला सामोरे जावे लागते. यंदा शहरातील काही रक्तपेढय़ांना उन्हाळी रक्तटंचाईवर माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांचा आधार मिळतो आहे. परंतु सर्वच रक्तपेढय़ांमध्ये ही परिस्थिती नाही.

‘एएफएमसी’च्या ‘इम्यूनोहेमॅटोलॉजी व रक्तसंक्रमण’ विभागाने ‘ए’ व ‘बी’- पॉझिटिव्ह रक्तगटांचे रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांना संस्थेच्या रक्तपेढीत रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. संस्थेच्या रक्तपेढीचे प्रमुख प्रथीश कुमार म्हणाले, ‘‘इतर वेळी नियमित रक्तदान शिबिरे होतात, परंतु उन्हाळ्यात शिबिरे कमी झाल्यामुळे रक्ताची कमतरता भासते आहे. सध्या आम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदान करण्याची विनंती करतो आहोत. परंतु बाहेरगावच्या रुग्णांबरोबर अनेकदा रक्तदान करण्यासाठी रक्तदाता नसतो. रुग्णालयात येणाऱ्या ‘थॅलसेमिया’च्या रुग्णांना रक्त पुरवावे लागत असून कर्करोग व हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनाही मोठय़ा प्रमाणावर रक्ताची गरज भासते. या सर्व गोष्टींमुळे रक्तसाठा पुरेसा होत नाही.’’ ‘एएफएमसी’मध्ये जाऊन रक्तदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपल्याशी ९६०४५५४०६८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रथीश कुमार यांनी सांगितले.