‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’चा रविवारी प्रयोग
आपल्या अनोख्या शब्दकळेने ‘मौनराग’ आळवीत रसिकांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार महेश एलकुंचवार यांच्या लेखणीचा सलग नाटय़ानुभव रविवारी (१२ जून) पुणेकरांना अनुभवता येणार आहे. एलकुंचवार यांच्या त्रिनाटय़धारेतील ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ या व्यावसायिक नाटकांच्या सलग प्रयोगाचा बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शुभारंभ होणार आहे. पुण्यातील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबविण्याचा मानस आहे.
‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचे आतापर्यंत व्यावसायिक रंगभूमीवर १४० प्रयोग झाले असून ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाचे सात प्रयोग झाले आहेत. असे असताना या दोन्ही नाटकांचा सलग नाटय़ानुभव रसिकांना देण्याचे धाडस करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले. निवेदिता जोशी-सराफ, प्रसाद ओक, वैभव मांगले, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर असे तगडे कलाकार या नाटकामध्ये काम करीत आहेत. चित्रपट आणि मालिकांमध्ये यशस्वी असलेल्या या कलाकारांची नाळ रंगभूमीशी जोडली गेली आहे. केवळ नाटकात काम करण्याची ऊर्मी असल्यामुळे हे कलाकार पाच दिवस त्यांच्या कामामध्ये व्यग्र राहून शनिवार आणि रविवार नाटकासाठी देत आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’चे प्रयोग पाहण्यासाठी युवा पिढी येत असून हे सुचिन्ह आहे. एलकुंचवार या लेखकाच्या भावविश्वामध्ये रसिक प्रेक्षकांना सहा तास रमता यावे हाच या सलग नाटय़प्रयोग करण्यामागचा उद्देश असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.
आविष्कार संस्थेसाठी यापूर्वी मी एलकुंचवारांची ही त्रिनाटय़धारा रंगभूमीवर आणली होती. ‘वाडा चिरेबंदी’तील व्यक्तिरेखांचे दहा वर्षांनंतर नेमके काय होते असा विचार एलकुंचवार यांच्या मनात आला. समाज बदलतो तशी मूल्यं बदलतात. पिढी बदलते तसे नातेसंबंधही बदलतात. हे ध्यानात घेऊन प्रकाश टाकण्याच्या उद्देशातून ‘वाडा’चा दुसरा भाग म्हणून एलकुंचवारांनी ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाचे लेखन केले. १९९४ मध्ये डॉ. श्रीराम लागू यांच्या घरी या नाटकाचे वाचन झाले होते तेव्हाच मी एलकुंचवार यांना हे नाटक करणार असल्याचे सांगितले होते. माझ्यासारख्या तेव्हा नवख्या असलेल्या दिग्दर्शकाकडे त्यांनी आपले नाटक विश्वासाने सोपविले होते, अशी आठवणही कुलकर्णी यांनी सांगितली.

हे नाटक महाराष्ट्राचे
‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाचे लेखक विदर्भाचे. दिग्दर्शक मराठवाडय़ाचा आणि यातील कलाकार मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि कोकण अशा विविध प्रांतातून आलेले. त्यामुळे हे नाटक अवघ्या महाराष्ट्राचेच आहे, अशी टिप्पणी चंद्रकांत कुलकर्णी यांनी केली.