साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे शिर्डीच्या ग्रामस्थांनी शहर बंदची हाक दिली असून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या घडीला श्रद्धा आणि सबुरी हाच मंत्र असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

मुंडे म्हणाले, “साईबाबांनी सर्व भक्तांना एक मंत्र दिला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या ज्या वेळी संकट आणि प्रश्न निर्माण होतात. त्या त्या वेळी साईंचे भक्त त्यांच्या चरणी माथा टेकवतात आणि त्यांचा मंत्र समजून घेतात. तो मंत्र म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा. आजच्या प्रसंगाला देखील तेच उत्तर असेल.”

दरम्यान, साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या शिर्डी आणि पाथरीमध्ये वाद निर्माण झाला आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत कधीही आपले नाव, जात व धर्म उघड केला नाही. पण साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्य़ातील पाथरी येथे असल्याची चर्चा सुरू झाल्याने वादाला तोंड फुटले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाथरीच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे जाहीर केल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे.

पाथरीच्या विकासाला शंभर कोटी देण्यास आमचा विरोध नाही. पण बाबांचे जन्मस्थळ पाथरी असल्याच्या तर्काला आमचा विरोध आहे. बाबांनी जन्मस्थळ उघड केले नाही. पण ठाकरे यांच्यामुळे जन्मस्थानावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ते भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे आहे. त्यामुळे पाथरीची जन्मस्थान म्हणून ओळख नको, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी रविवारपासून बेमुदत शिर्डी बंदचे आवाहन केले आहे. बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, साई मंदिर सुरू राहणार आहे. पण, वाहनांसोबत शिर्डीतील हॉटेल्स आणि दुकानं देखील बंद असल्याने साईभक्तांची मोठी गैरसोय झाली आहे.