गदिमा प्रतिष्ठानाच्या वतीने देण्यात येणारा ‘गदिमा पुरस्कार’ यंदा प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत मोघे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘गृहिणी सखी सचिव’ पुरस्कार मधुरा जसराज यांना, ‘चैत्रबन’ पुरस्कार नाटककार, अभिनेते गुरू ठाकूर यांना, तर ‘विद्या प्रज्ञा’ पुरस्कार प्रसिद्ध युवा गायिका विभावरी आपटे-जोशी यांना जाहीर झाला आहे. ग. दि. माडगूळकरांच्या स्मृतिदिनी १४ डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ कवी ना. धों महानोर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी श्रीधर माडगूळकर, राम कोल्हटकर उपस्थित होते. श्रीकांत मोघे यांनी गदिमा यांच्या ‘प्रपंच’ या चित्रपटातून कलाक्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी गेली चार दशके मराठी नाटय़ व चित्रपटसृष्टी गाजवली. वाऱ्यावरची वरात, लेकुरे उदंड जाहली ही त्याची नाटके गाजली. १३ नाटके, १७ चित्रपट आणि स्वामी, अवंतिका, मशाल यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांना जाहीर झालेल्या गदिमा पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.
संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘गृहिणी सखी सचिव’ पुरस्काराचे स्वरूप अकरा हजार रुपये, सन्मनपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. ‘चैत्रबन’ पुरस्कार आणि ‘विद्या प्रज्ञा’ पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मनपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. यासोबतच प्रतीक विश्वास फाळके या विद्यार्थ्यांला शालान्त परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक ९८ गुण मिळाल्याबद्दल अडीच हजार रुपये, सन्मनपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
‘तरतूद असूनही गदिमा स्मारकाचे बांधकाम नाही’
‘‘पुणे महापालिकेतर्फे पाच वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या गदिमांच्या पुण्यातील स्मारकासाठी दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये तरतूद होऊनही अद्याप कोणतेही बांधकाम झालेले नाही. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार २००८-०९, २००९-१० तसेच २०११-१२ च्या अंदाज पत्रकांमध्ये स्मारकासाठी व सांस्कृतिक भवनासाठी सुमारे पाच कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यामधून सुमारे १ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, इतका खर्च होऊनही सदर जागेवर कोणतेही बांधकाम झालेले नाही,’’ अशी माहिती श्रीधर माडगूळकर यांनी दिली.