26 February 2021

News Flash

करोनाच्या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा आदर्श निर्णय

मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकारपरिषदेत दिली माहिती

राज्यात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना मागील पाच महिन्यांपासून सण उत्सव घरीच साजरे करावे लागले आहेत. आता आपला गणेशोत्सव देखील त्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. पुणे शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणार्‍या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाने एक निर्णय घेतला आहे. यंदाचा गणेशोत्सवर मंदिरामध्येच साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अशोक गोडसे म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून आपण सर्व उत्साहाच्या वातावरणात गणेश उत्सव साजरा करीत आलो आहोत. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी आहे. शहरात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार आपण यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने आणि मुख्य मंदिरात साजरा करीत आहोत. मंदिराच्या बाहेरून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणोशोत्सवात भाविक गणरायाच्या चरणी मोठ्याप्रमाणावर हार, फुले, नारळ आणि पेढे अर्पण करत असतात. मात्र यंदा या वस्तूंचा स्वीकार केला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच ते पुढे म्हणाले की, या उत्सव काळात मंदिरात अभिषेक, पूजा, आरती आणि गणेशयाग गुरुजी करणार आहेत. तर भाविकांच्या हस्ते दरवर्षी उत्सव मंडपाच्या ठिकाणी होणारे अभिषेक रद्द करण्यात आले आहेत. मात्र भाविकांनी नाव आणि गोत्र यांची ऑनलाईन नोंदणी केल्यास, गुरुजींमार्फत ऑनलाईन अभिषेक करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेले कार्यक्रम देखील यंदा रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

एलईडी स्क्रिनची व्यवस्था आणि ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सुरक्षाकवच –
गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांसाठी बेलबाग चौक आणि बुधवार चौक येथे एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना लांबून देखील दर्शन घेता येईल. तसेच मंदिरामध्ये आणि परिसरात कायमस्वरुपी असलेल्या ६० सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जात आहेत.

गणरायाचे ऑनलाईन दर्शन देखील घेता येणार –
यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने मंडळामार्फत ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अथर्वशीर्ष या विषयावर प.पू. स्वानंदशास्त्री पुंड महाराज यांचे निरुपण, दिनांक ११ ते ३१ ऑगस्ट दरम्यान दररोज दुपारी ४ वाजता होणार आहे. याशिवाय स्वराभिषेक देखील दिनांक १८ ऑगस्टपासून सकाळी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध कलाकार आपली कला श्रीं चरणी अर्पण करणार आहेत. उत्सवकाळात श्रीं ची आरती ऑनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी साडेसात आणि रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येणार आहे.

श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्ट मार्फत करण्यात आली असून वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील अशोक गोडसे यांनी केले आहे.

ऑनलाइन गणेश मूर्ती खरेदीस प्राधान्य द्यावे – सहआयुक्त शिसवे
पुणे शहरात वाढत्या करोनाबाधित रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर आपण साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहोत. गणरायाचे आगमन २२ ऑगस्ट रोजी होणार असल्याने, त्या एकाच दिवशी रस्त्यावर जवळपास २० लाखांच्या आसपास नागरिक येतील. त्या दृष्टीने नागरिकांनी त्यापूर्वीच गणपती बाप्पाची मूर्ती अगोदरच खरेदी करून घ्यावी. तसेच काही विक्रेत्यांनी ऑनलाइन गणपती पोहचविण्याची देखील व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनी त्या सेवेला प्राधान्य द्यावे , असे पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी आवाहन केले आहे.

यंदा कोणत्याही ठिकाणी विसर्जन हौद उभारणार नाही – महापौर मोहोळ
पुणे शहरात जवळपास घरगुती आणि गणेश मंडळं मिळून पाच लाख गणपती बसवले जातात. मात्र यंदा करोनाबाधित रुग्णांची परिस्थिती लक्षात घेता, घरगुती गणपतींनी घरीच आणि मंडळीनी त्याच ठिकाणी गणपतीचे विसर्जन करावे. तसेच यंदा कोणत्याही ठिकाणी महापालिका प्रशासन विसर्जन हौद उभारणार नाही. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 12:47 pm

Web Title: shrimant dagdusheth halwai ganpati mandal took this decision regarding this years ganeshotsav msr 87 svk 88
टॅग : Ganeshotsav
Next Stories
1 पुणे – नाशिक अंतर फक्त दोन तासांत
2 कांद्याची दरघसरण ; मागणी नसल्याने शेतकरी संकटात 
3 पुण्यात दिवसभरात १ हजार ३९० नवे करोनाबाधित, २४ जणांचा मृत्यू
Just Now!
X