‘थोरले बाजीराव पेशवे यांनी आम्हाला शौर्याचा रस्ता दाखवला. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरच आता चालायचे आहे. देशाचे संरक्षण तसेच, प्रगती सर्वाच्या हातात आहे, असे मत परमवीरचक्र विजेते ऑनररी कॅप्टन बाणासिंह यांनी व्यक्त केले.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान, मराठी राज्य स्मृती प्रतिष्ठान आणि चित्पावन अस्तित्व संस्थांतर्फे बाणासिंह यांना बाजीराव पेशवे यांचे दहावे वंशज उदयसिंह पेशवे यांच्या हस्ते ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
‘शिवाजी महाराजांमध्ये बळ होते, ताकद होती आणि उत्साह होता. त्याचाच आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायला पाहीजे,’ असेही बाणासिंह यांनी सांगितले. कार्यक्रमाला आमदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे शेखर चरेंगावकर, एअर मार्शल भूषण गोखले, मोहन शेटे, कुंदन कुमार साठे आदी उपस्थित होते. बाजीराव पेशवे यांची एकही प्रतिमा किंवा स्मारक लोकसभा, विधानसभा आणि नॅशनल डिफेन्स अॅकेडमी येथे नाही याची खंत वाटते, असे उदयसिंह पेशवे म्हणाले.