श्रीपाल सबनीस यांची टिप्पणी
आजवरच्या साहित्य संमेलनाध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व घटकांना सामावून घेणारी, साहित्य आणि संस्कृतीचे संचित पेलवणारी भूमिका मांडली नाही. मुस्लिम, भटके, दलित या घटकांविषयी दोन ओळीदेखील कोणाच्या भाषणात नव्हत्या. केवळ मेहुण म्हणून मिरवण्यासाठी संमेलनाध्यक्षाचे पद वापरण्यात आले, अशी टिप्पणी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी केली. काहींनी चुकीचे सिद्धांत मांडले तर, काहींनी तकलादू भूमिका मांडली, असेही ते म्हणाले. असे लोक संमेलनाध्यक्ष होत असतील तर मग मी का नको, या भूमिकेतून अध्यक्षपदाची निवडणूक लढविली, असे सबनीस यांनी सांगितले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे वादे संवादे या कार्यक्रमात डॉ. सबनीस यांची मुलाखत लेखक राजन खान यांनी घेतली.
लोकांच्या मनात अभ्यासक-विचारवंत ही माझी ओळख आहे. कोण हे सबनीस, असा सवाल करणारे लेखक हेच या कटाचे खलनायक आहेत. सबनीस हे ब्राह्मण असूनही ते बहुजनविरोधी नाहीत, हे सिद्ध न करता आल्याने अनेक लेखकांनी माझ्याविरोधात आघाडी उघडली होती. हे माझ्या विरोधातील राजकारण होते, असा आरोप डॉ. सबनीस यांनी केला.
मी रूढ अर्थाने डावा आणि पुरोगामी आहे. पण सत्य फक्त पुरोगामी-प्रतिगामी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशा टोकांमध्ये बंदिस्त करता येत नाही. डाव्या प्रवाहातील विकृती दृष्टिआड करता येणार नाही. राष्ट्रप्रेमासाठी त्याग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे फक्त हिंदुत्ववाद्यांचे किंवा भाजपचे कसे राहतात, अंदमानच्या कारागृहातील ओळी काढल्याचे स्वागत काँग्रेस कशी करू शकते, असा सडेतोड सवाल डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला. सर्व जातींमध्ये ब्राह्मण्य असून ब्राह्मण-ब्राह्मणेतर या वादांत महाराष्ट्राची, मानवतेची व सत्याची दमछाक झाली आहे, असेही ते म्हणाले.