18 January 2021

News Flash

नाटक बिटक : खिळवून ठेवणारे सजीव देखावे

रोजचा रात्रीचा देखावा संपला, की कपडेपट आणि त्या देखाव्यासंबंधीच्या छोटय़ा वस्तू काळजीपूर्वक ठेवणे आवश्यक असते.

(संग्रहित छायाचित्र)

श्रीराम ओक

गणेशोत्सव आणि देखावे हे समीकरण ठरलेलेच. गणपतीतील गाण्याच्या तालावर नाचणारे कारंजे किंवा विद्युत देखावे करणे हे जसे अनेक गणेश मंडळांना आवडते, तसेच काही मंडळे आवर्जून हलते देखावे आणि त्यातही सजीव देखावे करणे पसंत करतात. सजीव देखाव्यांसाठी कलाकारांची जमवाजमव करण्यापासून त्यांच्यासाठी सुयोग्य वेशभूषेपासून नेपथ्यापर्यंत अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. रोजचा रात्रीचा देखावा संपला, की कपडेपट आणि त्या देखाव्यासंबंधीच्या छोटय़ा वस्तू काळजीपूर्वक ठेवणे आवश्यक असते.

सजीव देखाव्यांना अनुसरून विषय निवड, कलाकार निवड, ध्वनिमुद्रण, वेशभूषा, केशभूषा, संगीत, निवेदन या सगळ्यांचा सुयोग्य ताळमेळ साधावा लागतो. या सगळ्या गोष्टींची तयारी दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होते. काही मंडळांचा विषय ठरलेला असतो, तो विषय सजीव देखाव्यांसाठी काम करणाऱ्यांपर्यंत पोहोचवणे अन्यथा अशा प्रकारच्या कंत्राटी घेणाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी निवडलेल्या विषयांवर सर्वच बाजूंनी विचारविनिमय करणे आवश्यक असते. यामध्ये आर्थिक बाबींपासून मंडळाची प्रतिमा, मंडळांतील कार्यकर्त्यांचा, त्या भौगोलिक परिसराची मानसिकता तसेच देखावे बघण्यास येणाऱ्या भक्तांचा विचार देखील आवश्यक ठरतो.

गणेश लोणारे यांचा कला ग्रुप सोळा वर्षांहून अधिक काळ सजीव देखाव्यांच्या विषय निवडीपासून ते सादरीकरणापर्यंतचे कार्य करतो आहे. गणेश हे स्वत: कलाकार आहेत. दोन अंगांनी त्यांच्यातील कला विकसित झाली आहे. एकतर ते अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहेत आणि वेशभूषानिर्मितीमध्ये देखील त्यांचा हातखंडा आहे. ऐतिहासिक देखाव्यांमध्ये लागणारे अंगरखे असोत नाहीतर इतर वेशभूषा ती तयार करीत असताना ती अधिक सुबक व्हावी, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी कापडाच्या किमतीकडे न पाहता कापडाची भरजरीपणा तसेच त्याच्यावरची कलमगारी, कापडाचा कसदारपणा यांचाही विचार करून त्या कापडाचा वापर ते करतात.

वेशभूषेबरोबरच नेपथ्यनिर्मितीसाठी देखील त्यांच्याकडे चमू असून विषय निवड, नेपथ्य ते सादरीकरण या सर्वच बाबी ते लीलया हाताळतात. प्रत्येकाच्या हाताला काम आणि पोटाला जेवण मिळाले पाहिजे या तत्त्वावर आधारित काम करताना या क्षेत्रात येणाऱ्याला सुयोग्य संधी देखील मिळाली पाहिजे यासाठी ते झटतात. कलाकाराचा सन्मान राखत त्यांना सुयोग्य मानधन देत असतानाच वर्षभरातील त्यांच्या अडीअडचणी, दुखणीखुपणी, रुग्णालयात जाण्याचा त्यांना काही प्रसंग आलाच तर त्यांना औषधे किंवा वैद्यकीय सेवेसाठी लागणारी आर्थिक मदतही ते अगदी निव्र्याजपणे करतात. श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही या निमित्ताने अग्रेसर असणारे गणेश यांच्याकडे शिक्षकापासून, विविध क्षेत्रातील तीनशे कलाकारांची बांधिलकी त्यांनी जपली आहे. यामध्ये हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या माणसातही कलाकार दडलेला असतो आणि त्याच्या कलेला प्रोत्साहन मिळाली पाहिजे, यासाठी गणेश झटतात.

देखाव्यांच्या भव्यतेपासून विविध बाबी सांभाळणात असतानाच एखाद्या विषयाला संपूर्ण न्याय मिळेल, यासाठी ते झटतात. पस्तीस ते चाळीस मिनिटांचे हे सादरीकरण रात्री दहापर्यंत वेळ असते, तेव्हा पाच ते सहा वेळा होते. तर बारापर्यंत वेळ असताना ते दहाबारा वेळा देखील करावे लागते. या काळात कलाकारांच्या उदरभरणाची काही जबाबदारी लोणारे तर काही जबाबदारी गणेशमंडळे देखील घेतात. एखाद्या देखाव्यात पन्नासपर्यंत कलाकार असतात. मागच्या वर्षी झाशीच्या राणीच्या देखाव्यासाठी त्यांनी पूनम भागवत हिला अश्वारोहण प्रशिक्षण आणि सराव दिला. त्यानंतर त्या आता विविध दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये देखील कार्यरत आहेत.

यंदा सदाशिव पेठेतील नवजीवन मंडळासाठी त्यांनी शिवराज्यभिषेक देखावा साकारला असून त्यात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत विविध गोष्टींचा मागोवा त्यांनी घेतला आहे. त्यांचा यंदाचा दुसरा देखावा हा कोळीगीतावर आधारित आहे. सध्या दूरचित्रवाहिनीवरील ऐतिहासिक मालिकेसाठी ते अभिनेता तसेच वेशभूषाकार अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असल्यामुळे त्यांनी फक्त दोनच देखाव्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या देखाव्यांसाठी पन्नास हजार ते पाच लाखांपर्यंत मानधन आकारले जात असल्याचे लोणारे सांगतात.

गणेशोत्सवानंतर येणाऱ्या नवरात्र उत्सवातही मागील पाच वर्षांपासून लोणारे यांच्या चमूचा सहभाग असतो. अलका टॉकीजसमोरील मंडळामध्ये नवरात्रतही लोणारे यांचे सजीव देखावे पाहता येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 3:30 am

Web Title: shriram oak article on ganpati decoration scenes
Next Stories
1 पुण्यात युवक काँग्रेसमधील निवडणुकीत राडा
2 ‘गणपतीमध्ये डॉल्बी लावणारच!’, उदयनराजेंनी थेट पोलिसांनाच दिलं आव्हान
3 मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर वाहतूक कोंडी
Just Now!
X