श्रीराम ओक

आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. हा योग पराग बोहोडकर यांच्या आयुष्यात आला आणि त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले. चौदा विद्या, चौसष्ट कलांची देवता असणाऱ्या गणरायाचा वरदहस्त त्यांना लाभला आणि मग पराग यांनी मागे वळून पाहिलेच नाही. बालनाटय़ापासून प्रायोगिक रंगभूमीपर्यंत आणि ऑर्केस्ट्रापासून व्यावसायिक नाटकांपर्यंत सर्वत्र संचार असलेल्या या कलाकाराला गणेशोत्सावातील सजीव देखाव्यांमध्ये ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे साकारण्याची संधी मिळाली. इतकेच नाही, तर अनेकानेक व्यक्तिरेखांना आवाज देत त्या व्यक्तिरेखांना गणेशभक्तांच्या मनात स्थान मिळवून दिले.

गाण्याचा गळा, त्यावर रियाजाची मेहनत आणि अभिनयाचे अंग यामुळे एक तपाहून अधिक काळ ते गणेशोत्सवातील सजीव देखाव्यांसाठीच्या व्यक्तिरेखांसाठी आवाज देण्यापासून, निवेदन, दिग्दर्शन, अभिनय अशा विविधांगी भूमिका पार पाडत आहेत. गोळीबार मैदान येथे डिफेन्स अकाउंट्समध्ये नोकरी करतानाच आवड म्हणून कलाप्रेम जपणाऱ्या पराग यांनी ‘गाढवाचं लग्न’ या वगनाटय़ात प्रकाश आणि जयमाला इनामदार यांच्याबरोबर साडेतीनशेहून अधिक प्रयोगामध्ये बुवाची भूमिका साकारली. तसेच दूरदर्शनच्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्यासमोर गण सादर करता आला. हेमा आणि सात बुटके या नाटकातील आठवा आंगतुक बुटका साकारण्यापासून या नाटय़ाचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले.

पं. राम माटे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे बावीस वर्ष धडे घेतलेल्या पराग यांनी अनेक वर्ष ऑर्केस्ट्रामध्ये गायन केले, पण ऑर्केस्ट्राचे बदलते स्वरूप त्यांना रुचले नाही. नाटकामध्ये विविधांगी भूमिका साकारण्याबरोबरच दिग्दर्शनाची आवडही त्यांनी जोपासली. मधु कांबीकर यांच्या ‘सखी माझी लावणी’ मध्ये शाहिराची भूमिका साकारली.

या निमित्ताने लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, पांडुरंगभाऊ घोटकर, शकुंतला नगरकर, वसंत अवसरीकर, अशोक आणि सुचेता अवचट, आनंद कोल्हटकर  अशा अनेकांचा सहवास लाभल्याचा पराग आवर्जून सांगतात. सखीचा प्रयोग घेऊन दुबईपर्यंतचा प्रवासही त्यांनी केला. गण-गवळण, त्यांचे गायन, तसेच लावणीतील विविध रंग त्यांना यामुळे समजले, पुढे पुणे विद्यापीठातील एका अभ्यासक्रमात त्यांनी लावणीसंदर्भातील अनेक गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या.

‘तुका म्हणे आता’साठी श्रीकांत मोघे यांच्याबरोबर काम करण्याची मिळाली. त्यात त्यांनी रामशास्त्री प्रभुणे यांची भूमिका साकारली. ‘तो मी नव्हेच’मध्ये डॉ. गिरीश ओक यांच्यासह तीन वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. रामलालच्या भूमिकेतून ‘एकच प्याला’ नाटकाचे त्यांनी शंभरहून अधिक प्रयोग केले. इतकंच नाही, तर ‘मोहम्मद तुघलक’ मध्ये मुख्य खलनायकापासून जवळजवळ सर्वच भूमिका पराग यांनी साकारल्या. ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांच्यामुळे खूप काही शिकता आल्याची कृतज्ञ भावनाही ते व्यक्त करतात. थिएटर अ‍ॅकॅडमीच्या ‘घाशीराम कोतवाल’, ‘जळली तुझी प्रीत’ या नाटकांतही त्यांनी काम केले.

शेती उत्पादनाच्या कॅम्पेनच्या निमित्ताने गाणी आणि विविध भूमिकांना आवाज देणाऱ्या पराग यांना अभिनेता अन्वय बेंद्रे यांनी गणेशोत्सवातील एका देखाव्यासाठी आवाज देण्याचा आग्रह केला. तिथून त्यांचा आवाजाच्या दुनियेत प्रवेश झाला. रियाज, वाचिक अभिनय, निरीक्षण, विविध बाज साकारण्याच्या क्षमतेमुळे  महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज अशा वेगवेगळ्या भूमिकांना दिलेला त्यांचा आवाज गणेशभक्तांच्या मनात सहजच घर करतो. डेक्कन जिमखानावरील एका मंडळाचा देखावा पाहण्यासाठी रोज एक आजोबा नातवाला घेऊन येत असत. तो देखावा किमान दोनदा पाहून मगच ते घरी जायचे, असे अनेकानेक अनुभव पराग यांच्या गाठीशी आहेत. या शिवाय या देखाव्यांसाठी मागील चार वर्षांपासून ते करीत असलेले दिग्दर्शन आणि त्यातून साकार होणारे देखावे, गणेशभक्तांना खिळवून ठेवतात.

विविध नाटकांसाठी दिग्दर्शन केल्यामुळे आणि माधव वझे यांच्या तालमीत तयार झालेल्या पराग यांच्याकडे कलाकाराची नस पकडण्याचे, गणेशोत्सवाचे देखावे जिवंत करण्याचे कसब आहे. त्या तंत्राद्वारे त्यांनी कलाकारांनाही कामाचं समाधान मिळवून दिले आहे.

कलाकारातील कलागुण आणि आपल्याला जे हवे आहे, ते लीलया काढून घेण्याची ताकद त्यांच्या दिग्दर्शनात असल्यामुळे देखावा पूर्ण नव्हे, तर परत-परत पाहून नंतरच गणेशभक्त पुढील मंडळाच्या दिशेने जातात. तत्पूर्वी कलाकारांना प्रत्यक्ष भेटून आवर्जून दादही देतात.

shriram.oak@expressindia.com