करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक मंदिरं बंद आहेत. याचाच फायदा घेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ओझर गावाच्या गणपती मंदिरात चोरी झाली आहे. अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी एक असेलल्या गणपती मंदिरात चोरट्यांनी मंदिर बंद असल्याचा फायदा घेत चोरी केली आहे. ही बातमी गावात पसरताच गावातील अनेक कार्यकर्ते मंदिरात गोळा झाले आहेत. सरपंच यांनी पोलिसांना प्रचारण करून लवकरात लवकर तपास करण्याची विनंती केली.

चोरांनी मंदिरातील दानपेटीसह चांदीची छत्रीही लंपास केली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास मंदिरात चोरी झाली. लॉकडाउनच्या काळात सर्व मंदिर आणि देवस्थान तुर्तास बंद आहे. त्यामुळे मंदिरात शुकशुकाट आहे. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने ओझर गणपती मंदिरात हात साफ केला.

सरपंचांनी मंदिरातील चोरीची माहिती देताच पोलिस दाखल झाले. पोलिसांनी मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली. या पाहणीतून मंदिरापासून काही अंतरावर चोरी केलेल्या काही वस्तू आढळून आल्या आहेत.

ओझरचा विघ्नहर
अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा. १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला. विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे.