काही वर्षांपूर्वी फक्त हेटाळणी वाटय़ाला येणाऱ्या, आत्मविश्वास गमावलेल्या मुलांना उमेद देणाऱ्या.. ‘हे आमच्याच वाटय़ाला का?’ या भावनेने निराश झालेल्या पालकांना त्यांच्या मुलांची ‘विशेष’ ओळख करून देणाऱ्या प्रवासाने या वर्षी पंचविशी पार केली आहे. विशेष मुलांसाठी कार्यरत असणारे प्रिझम फाऊंडेशनचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्याची सांगता सोमवारी (१ जून) होत आहे.
विशेष शिक्षण क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे प्रिझम फाऊंडेशनने एक मोठा टप्पा गाठला आहे. १९९० साली प्रिझम फाऊंडेशन सुरू झाले. सुरुवातीला अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था सुरू करण्यात आली. प्रथम दर्शनी जाणवत नसले, तरी ‘काहीतरी कमी आहे’ या जाणिवेचे गांभीर्य आणि त्याच्यावरील उपाय डोळ्याआड करण्यात येत होते. अशावेळी अध्ययन अक्षम मुलांसाठी ‘फिनिक्स’ ही शाळा सुरू करण्यात आली. त्यानंतर संस्थेचा विस्तार वाढत गेला. संमिश्र अपंगत्वासाठी लर्निग असिस्टन्स सेंटर (लार्क), प्रौढांना पूर्व व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देणारी माधवी ओगले व्यावसायिक शाळा प्रिझमच्या छत्राखाली सुरू झाल्या. विशेष मुलांसाठी काम करणारे जागरूक कार्यकर्ते, पालक निर्माण व्हावेत या उद्देशाने ‘बेन्यू’ प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कलोपचार (आर्ट बेस्ड थेरपी) पद्धती वापरण्यासाठी ‘सृजनरंग कला अभिव्यक्ती केंद्र’ हे संस्थेकडून चालवण्यात येते. पालकांना समजावून देण्यापासून, या विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याच्या, त्यांना त्यांची ओळख मिळवून देताना अनेक आव्हानांना तोंड देत संस्थेने पंचवीस वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे.
संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षांचा सांगता समारंभ सोमवारी (१ जून) होणार आहे. निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर करंदीकर, खासदार अनिल शिरोळे यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. यावेळी प्रिझम फाऊंडेशनच्या शिक्षकांना ऋणानुबंध पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रिझमच्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीवर आधारित ‘पाऊलखुणा’ हा कार्यक्रमही यावेळी होणार आहे. एरंडवणे येथील कर्नाटक प्रशालेच्या ‘शकुंतला शेट्टी’ सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.