News Flash

‘आई रिटायर होतेय’ नाटकाच्या निर्मितीचा रौप्यमहोत्सव

नव्या कलाकारांच्या संचातील ‘आई रिटायर होतेय’ नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून शनिवारी (८ मार्च) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सायंकाळी पाच वाजता

| March 5, 2014 03:20 am

नोकरी करणाऱ्या प्रत्येकाचे निवृत्तीचे वय ठरलेले असते. घरातील बाबांप्रमाणे आईने निवृत्त होण्याचे ठरविले तर काय होते हा आशय मांडणारे अशोक पाटोळे लिखित ‘आई रिटायर होतेय’ हे नाटकाच्या निर्मितीचा यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. आईच्या मध्यवर्ती भूमिकेमध्ये भक्ती बर्वे यांच्या अभिनयाने ७५० प्रयोगांमध्ये रंग भरला गेला. आता नव्या कलाकारांच्या संचातील या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून शनिवारी (८ मार्च) यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
भक्ती बर्वे यांना डोळय़ांसमोर ठेवूनच ‘आई रिटायर होतेय’ नाटकाची निर्मिती झाली. दिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा १७ ऑगस्ट १९८९ रोजी मुंबईच्या शिवाजी मंदिर येथे झाला होता. त्यानंतर आई आणि भक्ती बर्वे हे एक समीकरणच होऊन गेले. ९०च्या दशकामध्ये घरातील मध्यमवयीन महिलेचा प्रश्न मांडणाऱ्या या नाटकाचे आणि भक्ती बर्वे यांच्या अभिनयाचे गारुड रसिकांवर होते. आयुष्यभर घरासाठी काबाडकष्ट उपसणाऱ्या आईसाठी सेवानिवृत्तीचे वय नसते. घरातील स्त्रीलाही कधीतरी कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त व्हावेसे वाटते. अशाच एका कुटुंबातील आई रिटायर होण्याचे ठरविते आणि त्यानंतर तिच्या जबाबदाऱ्या निभावताना सर्वाचीच दमछाक होते.
भक्ती बर्वे यांच्या आकस्मिक निधनानंतर अभिनेत्री स्मिता जयकर यांनी आईची भूमिका साकारताना १०० प्रयोग केले. त्यानंतर दिलीप कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली रवि सांभारे यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक नव्या कलाकारांच्या संचात रंगभूमीवर आले. उपेंद्र दाते, रश्मी देव, रूपाली पाथरे, रेणुका भिडे, सुशीला भोसले, आशुतोष नेर्लेकर या कलाकारांच्या यामध्ये भूमिका असून, आईची भूमिका वीणा फडके यांनी साकारली आहे. २५ वर्षांपूर्वी मांडलेली ही समस्या आता आणखी तीव्र झाली असल्याने नाटकाचा टवटवीतपणा कायम राहिला आहे.
‘आई’ हिंदी आणि गुजरातीमध्येही
‘आई रिटायर होतेय’ नाटकाचे यश पाहून हे नाटक हिंदी आणि गुजरातीमध्येही रंगभूमीवर साकारले गेले. अशोक लाल यांनी अनुवादित केलेल्या ‘माँ रिटायर होती है’ या नाटकात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी आईची मध्यवर्ती भूमिका रंगविली होती, तर अरिवद जोशी यांनी गुजराती रूपांतर केलेल्या ‘बा रिटायर भायछे’ या नाटकात पद्माबेन आणि सरिता जोशी यांनी आईची भूमिका साकारली होती.
‘पुलं’नी केली नाटकाची प्रशंसा
‘आई रिटायर होतेय’ नाटकाचा ७००वा प्रयोग १९९३ मध्ये महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या उपस्थितीत झाला होता. नाटकाचा प्रयोग आणि भक्ती बर्वे यांचा अभिनय पाहून ‘भाईं’नी त्यांच्या शैलीमध्ये पत्र लिहून या नाटकाची प्रशंसा केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2014 3:20 am

Web Title: silver jubilee drama aai retire hotey ashok patole
Next Stories
1 महापालिकेचा खजिना प्रथमच शिक्षकाच्या हाती
2 चार टक्के बांधकाम परवानगीमुळे टेकडय़ाच नष्ट होतील
3 मावळ लढतीचे चित्र अस्पष्टच; उमेदवार गुलदस्त्यात, उत्सुकता शिगेला! –
Just Now!
X