समाज कल्याण विभागात मागील सात वर्षांपासून प्रलंबित प्रकरणावर कार्यवाही करीत नसल्याने वैतागलेल्या एका महिलेने पुणे स्टेशन जवळील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणार्‍या एका टॉवरवर चढून मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच अग्निशामक विभागाच्या विभागाच्या जवानांनी तेथे धाव घेतल्याने संबंधीत महिलेची सुखरुप सुटका करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनूबाई येवले असे महिलेचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणार्‍या एका उंच टॉवरवर आज (दि.२९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोनूबाई टॉवरवर चढल्या आणि मोठ-मोठ्याने ओरडण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशामनच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत संबंधीत महिलेची समजूत काढून तीला सुखरुप खाली उतरवले.

माध्यमांशी बोलताना या महिलेने सांगितले की, समाज कल्याण विभागातील एका अधिकाऱ्यावर आरोप केले आहेत. आपल्या एका प्रकरणात हे अधिकारी लक्ष घालण्यास टाळाटाळ करीत आहेत. गेल्या सात वर्षांपासून हे प्रकरण त्यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीला वैतागून आपण आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.