ठेवी मोडून दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्याची वेळ आल्यामुळे परीक्षा शुल्क वाढवून द्यावे, अशी मागणी करणारे राज्य मंडळ आणि दरवर्षी निर्मिती खर्च परवडत नाही म्हणून पुस्तकांचे दर वाढवणारी बालभारती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सिंगापूर फिरवून आणणार आहे. विशेष म्हणजे ‘प्राथमिक शिक्षणाची’ गुणवत्ता वाढवण्यासाठी माध्यमिक परीक्षा घेणारे मंडळ खर्च करणार आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सिंगापूरच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे दहावी, बारावीच्या परीक्षेचा खर्च परवडत नाही म्हणून सत्तर टक्के ठेवी मोडून परीक्षा घेणारे राज्य मंडळ या दौऱ्याच्या एका गटाचा खर्च करणार आहे. शालेय शिक्षण विभागातील १० अधिकाऱ्यांचा एक गट असे दोन गट सिंगापूर येथील शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. यातील एका गटाचा खर्च राज्य मंडळ आणि एका गटाचा खर्च बालभारती करणार आहे. पाच दिवसांच्या या दौऱ्याच्या खर्चातील १० हजार रुपये किंवा एकूण खर्चाच्या एक चतुर्थाश खर्चापैकी कमी असलेली रक्कम या मोहिमेसाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांनी खर्च करायची आहे.
या मोहिमेचे खरे काव्य पुढेच आहे. शालेय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान यांनी सिंगापूरचा दौरा केला.  सिंगापूरमध्ये शिक्षणक्षेत्रामध्ये अनेक नव्या उपाययोजना करून अभूतपूर्व प्रगती केल्याचा साक्षात्कार या दौऱ्यामध्ये झाला आणि राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी राज्यमंडळाच्या आणि बालभारतीच्या खर्चाने अधिकाऱ्यांना सिंगापूर दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. राज्यात दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा खर्च व्याजातून भागत नसल्यामुळे ठेवी मोडून परीक्षा घेण्याची वेळ यावर्षी राज्य मंडळावर आली आहे. पैसे नाहीत म्हणून परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधनही २५ वरून ५० रुपये करण्याची मागणीही राज्य मंडळाने फेटाळून लावली आहे. परीक्षा आणि दंडातून जमा होणारी रक्कम हे राज्य मंडळाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे परीक्षांचे शुल्क आणि दंडाची रक्कम वाढवून मिळावी म्हणून राज्य मंडळाकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे, असे असताना अधिकाऱ्यांच्या सिंगापूर दौऱ्याच्या खर्चासाठी राज्य मंडळाकडे निधी कुठून आला असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खर्च किती?
ट्रॅव्हल एजंट्सने दिलेल्या माहितीनुसार सिंगापूरचा प्रवास खर्च, राहणे, खाणे, सिंगापूरमधील प्रवास हे सर्व मिळून साधारण प्रत्येक माणसामागे ६० हजार रुपये किमान खर्च येतो. यातील १० हजार रुपये अधिकाऱ्यांनी खर्च केले तरी दहा अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचे किमान ५ लाख रुपये राज्य मंडळाला खर्च करावे लागतील.
 दौरा कशासाठी?
‘शिक्षण हक्क कायद्यानुसार गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण देणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपाय करण्यासाठी हा दौरा करण्याचे शासनाने म्हटले आहे. मात्र, राज्य मंडळ हे माध्यमिक परीक्षा घेते, त्यांचा प्राथमिक शिक्षणाशी थेट संबंध नाही. बालभारती प्राथमिक वर्गाची पुस्तकनिर्मिती करत असली, तरी पहिली, दुसरीची नवी पुस्तके गेल्यावर्षी आली आहेत तर, तिसरी ते पाचवीच्या पुस्तकाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. असे असताना राज्य मंडळ आणि बालभारती या दौऱ्यातून नेमके काय साध्य करणार आहे?