अकरावी प्रवेशासाठी यावर्षी विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार वरचे महाविद्यालय मिळवण्याची (बेटरमेंट) एकच संधी मिळणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अकरावीची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेत तिन्ही फेऱ्यांपर्यंत बेटरमेंटची संधी दिल्यानंतर झालेला गोंधळ अनुभवल्यानंतर आता प्रवेश समितीने विद्यार्थ्यांना बेटरमेंटची एकच संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी अगदी सहाव्या फेरीपर्यंत ९० टक्के मिळालेले विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. या गोंधळाला आळा घालण्यासाठी यावर्षी एकच बेटरमेंट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा, इनहाऊस कोटा यांतील प्रवेशही ऑनलाईन अर्जाच्या आधारेच करण्याच्या सूचना प्रवेश समितीने महाविद्यालयांना दिल्या आहेत. कोटय़ातील प्रवेशासाठी महाविद्यालयाला त्यांचे अर्ज छापण्यासाठी यावर्षीपासून बंदी घालण्यात आली आहे. कोटय़ातील प्रवेश यावर्षीही नियमित प्रवेश प्रक्रियेपूर्वीच होणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना कोटा आणि नियमित प्रवेश प्रक्रिया असे दोन्ही पर्याय उपलब्ध असणार आहेत. या विद्यार्थ्यांनाही अर्जाचा पहिला आणि दुसरा भाग भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांनी अर्जाचा दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

ऑडिटची प्रक्रिया जाहीर करण्याची मागणी

शासकीय प्रवेश प्रक्रियेचे ऑडिट करणार असल्याचे शासन निर्णयांत नमूद करण्यात आले आहे. मात्र हे ऑडिट प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर किती दिवसांत करणार, कोणत्या मुद्दय़ांचे करणार, ते किती दिवसांत जाहीर करणार याचे तपशील शिक्षण विभागाने जाहीर करावेत, अशी मागणी ‘सिस्कॉम’ या संघटनेने केली आहे.