News Flash

चित्रपटगृह बंद करून अन्य व्यवसायासाठी परवानगी द्यावी

एकपडदा चित्रपटगृह मालकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एकपडदा चित्रपटगृह मालकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : एकपडदा चित्रपटगृह मालकांना चित्रपटगृह बंद करून अन्य व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी एकपडदा चित्रपटगृह मालकांच्या ‘पूना एक्झिबिटर्स असोसिएशन’ या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या निर्णयामुळे शासनाला वाढीव उत्पन्नाचे स्रोत मिळणार असून एकपडदा चित्रपटगृह मालकांना त्यांच्या गुंतवणुकीवर योग्य परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

‘पूना एक्झिबिटर्स असोसिएशन’चे अध्यक्ष सदानंद मोहोळ, सहसचिव दिलीप निकम, माजी अध्यक्ष दीपक कुदळे आणि माजी खासदार व चित्रपट व्यावसायिक अशोक मोहोळ यांनी एकपडदा चित्रपटगृह चालकांची कैफियत मांडून त्यावर अन्य व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. करोना संकटामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली असून एकपडदा चित्रपटगृह चालविणे अवघड झाले असल्याची व्यथा मांडण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील ३४ पैकी १८ एकपडदा चित्रपटगृहे बंद पडली आहेत. त्याच वेळी मल्टिप्लेक्सचे दीडशे पडदे झाले आहेत. बंद पडलेल्या एकपडदा चित्रपटगृहाच्या वास्तू पडीक असून कोणालाच फायदा होत नाही. राज्य सरकारने २००० मध्ये मल्टिप्लेक्स चित्रपटगृहासंबंधी कायदा करून विविध सवलतींद्वारे प्रोत्साहन दिले. त्या वेळी एकपडदा चित्रपटगृहांच्या वाटय़ाला निराशा आली. हा व्यवसाय बंद करून दुसरा काही व्यवसाय करावा असा विचार मनात आला तरी यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग शासनाने मोकळा ठेवला नाही. एकपडदा चित्रपटगृहचालकांची परिस्थिती राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा वेगळी नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

दूरदर्शन, ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म, नेटफ्लिक्स, अमेझॉन अशा घरबसल्या उपलब्ध होणाऱ्या स्वस्त पर्यायांमुळे प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यास उत्सुक नाही. अशा परिस्थितीमध्ये चित्रपटगृह बंद करण्याची कायदेशीर परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सर्वच चित्रपटगृह सभासद अर्धपोटी राहण्यापेक्षा, काही चित्रपटगृहं बंद झाल्यास उरलेल्यांचे पोट भरेल अशी भावना आहे. तरी आमची मागणी मान्य करून एकपडदा चित्रपटगृहांसाठी व्यवसाय बदल करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे.

शासनाचे वाढीव उत्पन्नाचे स्रोत

’ शासनाने परवानगी दिली तर सध्याच्या चित्रपटगृहाच्या जागेवर होणाऱ्या नवीन बांधकामामुळे वाढीव मुद्रांक शुल्क मिळेल.

’ नवीन बांधकाम साहित्य खरेदी आणि बांधकामातून वस्तू आणि सेवा कर मिळेल.

’ नवीन इमारतीवर महानगरपालिकेला वाढीव मिळकत कराद्वारे निधी मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 3:13 am

Web Title: single screen cinema owners demand to chief minister for allowing other business zws 70
Next Stories
1 गृहशिक्षणाची उत्सुकता
2 पाळीव कबुतर पकडल्याने अल्पवयीन मुलावर वार
3 वाळू चोरीच्या गुन्ह्य़ात कारवाई न करण्यासाठी लाच
Just Now!
X