पिठलं- भाकरी, मिरचीचा ठेचा, कांद्याची खेकडा भजी आणि मडक्यातलं घट्ट 15sinhagad1दही..वाचताक्षणी पुणेकरांच्या मनात येणारे पहिले नाव सिंहगडचे! केवळ वाचूनही तोंडाला पाणी सुटेल असा हा ‘मेन्यू’ पर्यटकांना आता ठरलेल्या दरांमध्ये मिळू शकणार आहे. वन खात्याने सिंहगडावरील हॉटेल चालकांना १५ पदार्थाचे दर ठरवून दिले आहेत.
उन्हाळी सुटय़ा सुरु झाल्यामुळे सध्या सिंहगडावर पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे. शनिवारी आणि रविवारी तर रोज दोन ते अडीच हजार पर्यटक गडाला भेट देत आहेत. इतर दिवशीही रोज ३०० ते ४०० पर्यटक गडावर जात आहेत. ही गर्दी पाहता या ठिकाणी मिळणाऱ्या खाद्यपदार्थाचे दर १ एप्रिलपासून निश्चित करण्यात येणार होते. वन खात्याने स्थानिक हॉटेल चालकांची बैठक घेऊन काही पदार्थाचे दर ठरवले असून या दरांचे फलक नुकतेच गडावर लावण्यात आले आहेत. या दरांनुसार झुणका- भाकरी ३० रुपये, वांग्याचे भरीत किंवा मटकीची उसळ ३० रुपये, भजी ४० रुपये, तर मटका दही २० रुपये दराने द्यावे असे हॉटेल धारकांना सांगण्यात आले आहे.
उपवनसंरक्षक सत्यजित गुजर म्हणाले, ‘‘सिंहगडावरील सर्व हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थासाठी सारखे दर आकारले जावेत असे ठरले होते. गडावर सध्या असलेली दुकाने खूप पूर्वीपासून तिथे आहेत. परंतु त्याहून अधिक दुकाने वाढू न देण्याकडे वन खात्याचे लक्ष आहे. सुटीच्या दिवशी गडाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून पर्यटकांनी प्लॅस्टिकच्या बाटल्या फेकून देण्याचा उपद्रवही मोठा आहे. तो थांबवण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांसाठी अनामत रक्कम भरणे बंधनकारक करण्याचेही विभागाने ठरवले आहे. गडावर विकल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटलीची किंमत १०० रुपये करावी आणि ग्राहकाने रिकामी बाटली परत दिल्यावर बाटलीच्या किमतीनुसार ८० ते ८५ रुपये त्याला परत मिळावेत अशी संकल्पना आहे. ती देखील लवकरच अमलात येईल.’’