सिंहगड रस्त्याला आखण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याला निधी उपलब्ध करून देण्याचा विषय वादग्रस्त ठरला असून या रस्त्याला वर्गीकरणाच्या माध्यमातून निधी द्यायला महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत विरोध केला. भाजप, मनसे आणि शिवसेनेच्या सदस्यांनी हा प्रस्ताव मंजूर करा असा आग्रह धरल्यानंतर अखेर मतदान घेण्यात आले आणि मतदानाने हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.
पु. ल. देशपांडे उद्यान ते वडगाव बुद्रुक दरम्यान कालव्याच्या काठाने रस्ता बांधण्याची महापालिकेची योजना आहे. या पर्यायी रस्त्याला पाटबंधारे विभागानेही परवानगी दिली असून स्थानिक सर्व नगरसेवकांनी या पर्यायी रस्त्यासाठी सातत्याने आग्रह धरला आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण या रस्त्यामुळे कमी होणार असल्यामुळे रस्त्याला तातडीने निधी उपलब्ध झाला पाहिजे अशी मागणी या नगरसेवकांकडून करण्यात येत होती. या रस्त्यासाठी अंदाजपत्रकात निधी नसल्यामुळे वर्गीकरणाच्या माध्यमातून या रस्त्याला आठ कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. स्थायी समितीच्या गेल्या मंगळवारी झालेल्या बैठकीतही हा प्रस्ताव मंजूर न करता तो पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे वादंगही झाले होते.
स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंगळवारी मंजुरीसाठी आल्यानंतर तो पुढे ढकलण्याची मागणी सत्ताधारी सदस्यांनी केली. त्याला भाजपच्या मुक्ता टिळक, श्रीकांत जगताप, मनसेचे अनिल राणे, राहुल तुपेरे आणि शिवसेनेचे भरत चौधरी यांनी विरोध केला. या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन वर्गीकरणाचा प्रस्ताव मान्य करा असा आग्रह या सदस्यांनी धरला होता. मात्र प्रस्ताव पुढे ढकलण्यावर सत्ताधारी ठाम राहिले. त्यामुळे मतदान घेण्यात आले आणि प्रस्ताव पुढे ढकलण्याची सूचना आठ विरुद्ध पाच मतांनी मंजूर झाली. हा प्रस्ताव पुढे ढकलण्याचेच काम स्थायी समितीमध्ये सुरू आहे. वास्तविक या रस्त्याला पाटबंधारे विभागानेही परवानगी दिली आहे. तरीही हा प्रस्ताव पुढे ढकलण्याचे कारण काय, अशी विचारणा भाजप आणि मनसेच्या सदस्यांनी केली आहे.