सिंहगडावर दरड कोसळण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी डोंगरांना जाळ्या लावण्याची कामे आता पावसाळ्यानंतरच होणार आहेत. सिंहगडावरील वन विभागाच्या क्षेत्रात दरड कोसळण्याची शक्यता असणारी १० ते १२ ठिकाणे असून पुरेशा निधीअभावी यंदा दरड प्रतिबंधक कामे अडकली आहेत.
डोंगरांना जाळ्या बसवण्याच्या सिंहगडावरील कामांसाठी एकूण साडेतीन ते चार कोटींचा प्रस्ताव आहे. या कामांसाठीचा निधी जिल्हा नियोजन व विकास महामंडळाकडून (डीपीडीसी) वन विभागाकडे येतो व वन विभागाकडून तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द केला जातो. प्रस्तावासाठीच्या निधीपैकी ७५ लाख रुपयांचा निधी मार्च महिन्यात प्राप्त झाला असला, तरी तो पुरेसा नाही. पुण्याच्या वन विभागाचे उपवनसंरक्षक सत्यजित गुजर म्हणाले, ‘दरडी कोसळू शकतील अशी १० ते १२ ठिकाणे वन विभागाने निश्चित केली आहेत. पुरेशा निधीअभावी या वर्षी जाळी बसवण्याची कामे होऊ शकली नाहीत. डीपीडीसीकडून या वर्षी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्याची शक्यता असून पुढच्या पावसाळ्यापूर्वी सिंहगडावरील जाळ्या बसवण्याची कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या वर्षी पाऊस तुलनेने कमी असल्यामुळे सिंहगडावर मोठी दरड कोसळलेली नाही.’
गडावर दरड कोसळल्यामुळे गड एखादा दिवस बंद ठेवण्याच्या घटना या पूर्वी घडलेल्या आहेत. पावसाळ्यामुळे आता सिंहगडावर गर्दीही प्रचंड वाढली असून सुट्टय़ांच्या दिवशी वाहनतळावर जागा मिळवण्यासाठी वाहनांना बराच वेळ थांबूनही राहावे लागते आहे. पर्यटकांची गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी गडावर पर्यटकांनी तीनच तास थांबावे, अशी सूचनाही वन विभागाने नुकतीच जाहीर केली आहे.