06 July 2020

News Flash

सिंहगड रस्ताही स्टॉल्सच्या भक्ष्यस्थानी!

शहरातील सगळ्या रस्त्यांवर नव्याने उभ्या राहू लागलेल्या स्टॉलसारख्या कावळ्याच्या छत्र्या पालिकेच्या अतिक्रमण विभाग सोडून सगळ्यांनाच कशा दिसतात

| September 23, 2014 03:12 am

शहरातील सगळ्या रस्त्यांवर नव्याने उभ्या राहू लागलेल्या स्टॉलसारख्या कावळ्याच्या छत्र्या पालिकेच्या अतिक्रमण विभाग सोडून सगळ्यांनाच कशा दिसतात आणि हा विभाग नगरसेवकांच्या हट्टाला बळी कसा पडतो, याचे भयावह दर्शन सारे पुणेकर सध्या घेत आहेत. शहरातील सगळे रस्ते बेकायदा स्टॉल्स आणि पथारीवाले यांनी भरून गेलेले असताना, सिंहगड रस्ता मात्र त्यापासून अनेक वर्षे अलिप्त राहिला. आता तोही नगरसेवक आणि प्रशासनाच्या भक्ष्यस्थानी पडू लागल्याचे चित्र दिसते आहे. रस्ते वाहनांच्या कायमस्वरूपी पार्किंगसाठी असतात, असे या रस्त्याच्या सुरुवातीपासूनच लक्षात येते. पर्वती जलकेंद्राच्या जवळ भर पदपथावर पालिकेने एक बांधकाम अर्धवट अवस्थेत ठेवले आहे. पादचाऱ्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे हे बांधकाम पालिकेला कसे दिसत नाही, असा प्रश्न तेथील रहिवासी करू लागले आहेत.
शहरातील सर्वात सुंदर उद्यान म्हणून ख्याती पावलेल्या पु. ल. देशपांडे उद्यानाच्या दारात तंबू ठोकून उभारलेला स्टॉल आजवर अतिक्रमण खात्याने एकदाही काढलेला नाही. एवढय़ा सुंदर उद्यानाच्या दारातच हे असुंदर कृत्य करणाऱ्यांना कुणाचे तरी आशीर्वाद असावेत, अशी रहिवाशांची आता खात्री झाली आहे. समोरच असलेल्या नवश्या मारुती मंदिराच्या समोर आणि मागे अचानक उद्भवलेल्या वडापावच्या गाडीनेही अनेकांना चक्रावून टाकले आहे. या रस्त्यावर रुग्णवाहिका, ट्रकसारखी मोठी वाहने कायमस्वरूपी लावण्याचा परवानाही पालिकेने तेथील कुणाला दिला असावा, अशी नागरिकांची समजूत आहे.
याच रस्त्यावर पालिकेने बांधून ठेवलेल्या भाजी मंडईच्या शुभारंभाला अद्याप मुहूर्त मिळालेला नसताना राजाराम पुलाच्या पलीकडील भाजी मंडईमुळे त्या अरुंद रस्त्यावरील वाहतुकीचा सतत खोळंबा होत असतो. परंतु पालिकेच्या अतिक्रमण खात्याला ही गोष्ट अजून कळलेलीच नाही. हीच अवस्था सिंहगड रस्त्यावरील संतोष हॉलपर्यंतच्या फळ बाजाराची. भर रस्त्यात फळांचे ढिगारे रचून त्यांची विक्री करणाऱ्यांना अधिकृत परवाने नसतानाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कशी होत नाही, या चिंतेने नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहरातील एकमेव स्टॉलविरहित रस्ता निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉलग्रस्त होण्याची भीती त्यामुळे व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 3:12 am

Web Title: sinhgad road unauthorised stall pmc market
टॅग Market,Pmc
Next Stories
1 ‘धमक्या येत असल्यास विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्या’
2 चतु:शृंगी मंदिर परिसरात यात्रेसाठी यंदाही रेडिओ स्टेशन!
3 पुण्यातील बेपत्ता तरुणांना गडचिरोलीच्या जंगलात भेलके यानेच पाठविल्याचे तपासात निष्पन्न
Just Now!
X