सदगुरू सीतारामबाबा उंडेगावकर यांच्या पार्थिवावर नगर जिल्ह्यातील खर्डा या गावीच अंत्यसंस्कार करावेत, असे आदेश न्यायालयाने सोमवारी दिले. सीतारामबाबा उंडेगावकर यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील रुबी रुग्णालयात निधन झाल्यानंतर पार्थिव ताब्यात घेण्यावरून व अंत्यविधीच्या ठिकाणावरून बाबांच्या भक्तांमध्ये वाद सुरू झाला होता. त्यामुळे गेले तीन दिवस बाबांचे पार्थिव रुग्णालयातच ठेवण्यात आले होते.
अंत्यविधीबाबत निर्माण झालेला तिढा रविवारीही सुटू न शकल्याने हा वाद थेट न्यायालयात गेला होता. सोमवारी यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी झाली आणि न्यायालयाने खर्डा येथेच अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले.
उंडेगावकर महाराज गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. रविवारी खर्डा येथील सीताराम गडावर त्यांच्या समाधी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, बाबांचे मूळ गाव असलेल्या मराठवाडय़ातील भक्तांनी त्यास विरोध करून बाबांची समाधी मूळ गावी उभारण्याची मागणी करून बाबांच्या पार्थिवाचा ताबा मागितला. बाबांनी बहुतांश कार्य खर्डा भागामधून केले. त्यांचा जन्म परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथे झाला. त्यामुळे नगरसह मराठवाडा भागामध्ये बाबांचे मोठय़ा प्रमाणावर शिष्य आहेत.
बाबांच्या पार्थिवाचा ताबा मिळविण्यासाठी मागील दोन दिवसांपासून भक्तांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे रुबी रुग्णालयाकडून हे प्रकरण पोलिसांकडे देण्यात आले. दोन्ही गटातील भक्तांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आपापली बाजू मांडली. मात्र, ही दिवाणी बाब असल्याने पोलिसांनी या प्रकरणामध्ये अधिक हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे बाबांचा अंत्यविधी कुठे होणार व कोणाला त्यांच्या पार्थिवाचा ताबा मिळणार हे रविवारीही स्पष्ट होऊ शकले नाही. आता भक्तांकडून हे प्रकरण दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आले.