सतार आणि व्हायोलिनवादनाची अनोखी जुगलबंदी
दोन स्वतंत्र वाद्ये.. वादनाची दोन स्वतंत्र अंगे.. दोघांची स्वतंत्र शैली.. दोघांच्याही कारकीर्दीचा प्रारंभ एकाच कालखंडातील.. दोघेही बुजुर्ग कलाकार आपल्या वादनातून ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची प्रचिती देत अनेक वर्षांनी रविवारी (२२ मे) प्रथमच एका व्यासपीठावर येत आहेत. हे कलाकार आहेत ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ आणि ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फैयाज हुसेन खाँ!
गानवर्धन संस्थेने सतार आणि व्हायोलिनवादनाच्या या अनोख्या जुगलबंदीचा योग जुळवून आणला आहे. पं. अरिवदकुमार आझाद हे या जुगलबंदीला तबलावादनाची साथसंगत करणार आहेत. सुचेता नातू स्मरणार्थ कीर्तन संजीवनी कै. पुष्पलता रानडे पुरस्कृत हा कार्यक्रम मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. ज्येष्ठ अस्थिशल्यविशारद डॉ. के. एच. संचेती आणि पुष्पलता रानडे यांचे पुत्र सुरेश रानडे, संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी आणि रवींद्र दुर्वे या वेळी उपस्थित राहणार आहेत.
उस्ताद उस्मान खाँ म्हणाले, ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. व्ही. जी. जोग यांच्यासमवेत मी यापूर्वी सतारवादन केले होते, मात्र फैयाजभाई यांच्यासमवेत मी प्रथमच वादन करणार आहे. मी तंतकारी अंगाने वादन करतो, तर फैयाजभाईंची शैली गायकी अंगाची आहे. आमच्यामध्ये हा वेगळेपणा आहे. हा वेगळेपणा असेल तरच ती जुगलबंदी ठरते. एकमेकांची कदर करीत परस्परपूरक वादन करीत आम्ही ही जुगलबंदी रंगविण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमची वाद्ये वेगळी असली तरी त्यातून वादन केले जाणारे राग, ताल आणि सूर एकच आहे याची प्रचिती रसिकांना यावी हाच यामागचा उद्देश आहे. यापूर्वी एका दूरचित्रवाणीसाठी मी, फैयाजभाई आणि बासरीवादक पं. केशव गिंडे एकत्र वादन केले होते. मात्र, फैयाजभाई आणि मी असे आम्ही प्रथमच एकत्रित वादन करणार आहोत.
उस्ताद फैयाज हुसेन खाँ म्हणाले, उस्ताद उस्मान खाँ यांच्याशी माझी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. आमची कारकीर्द एकाच वेळी सुरू झाली. राम कदम, वसंत पवार या संगीतकारांकडे आम्ही एकत्र वादन केले आहे. मात्र, एका व्यासपीठावर वादन करण्याचा योग गानवर्धन संस्थेने जुळवून आणला. आमची वाद्ये वेगळी असली तरी हिंदूस्थानी संगीताचे सूर एकच आहेत हेच या जुगलबंदीतून दाखवण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शाहिद परवेझ यांच्याबरोबर मी जुगलबंदी केली असली तरी उस्मान खाँ यांच्याबरोबर प्रथमच वादन करण्यासाठी मी उत्सुक आहे.