ब्रिटिश अधिकाऱ्यांची तैलचित्रे कुठे गेली?; नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊनही चित्रे जागेवर नाहीत

चिन्मय पाटणकर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिवाजी सभागृहात असलेली ब्रिटिश अधिकाऱ्यांची सहा तैलचित्रे गेली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य इमारतीच्या नूतनीकरणासाठी ही चित्रे काढून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आता नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण होऊनही सभागृहातील चित्रचौकटी अद्यापही रिकाम्याच आहेत.

पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीचे काम बिटिश काळात झाले. १८६४ मध्ये सर बर्टल फ्रेरे गव्हर्नर असताना ही इमारत बांधली गेली. अत्यंत देखणी आणि भव्य असलेली ही वास्तू हा पुण्यातील सर्वोत्तम वास्तूंपैकी एक आहे. मुख्य इमारतीमध्ये असलेल्या भव्य सभागृहाला काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले. सध्या या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांची चित्रे आहेत. मात्र, त्याच सभागृहातील ब्रिटिश अधिकाऱ्यांची तैलचित्रे असलेल्या सहा चित्रचौकटी रिकाम्याच दिसत आहेत. तत्कालिन गव्हर्नर सर बर्टल फ्रेरे यांच्यासह सर जेम्स रिवेट कार्नाक, जॉर्ज कॉबर्ट कॅनिंग, लॉर्ड हॅरिस चौथा, जॉन १३ वे बॅरॉन एल्फिस्टन, एडवर्ड सातवा, क्वीन अ‍ॅलेक्झांडा ही नावे रिकाम्या चित्रचौकटींखाली  दिसत आहेत.

जवळपास दहा वर्षांपूर्वी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या दुरुस्तीचे आणि नूतनीकरणाचे काम सुरू झाले. बरीच वर्षे हे काम रखडले होते. त्यासाठी ही चित्रे काढण्यात आली होती. आता नूतनीकरणाचे काम झाले आहे. मात्र, अद्याप चित्रे पुन्हा लावण्यात आलेली नाहीत.

चित्रकलेचा उत्तम नमुना

नूतनीकरणासाठी चित्रे काढण्यात आली हे ठीक आहे. मात्र, आता ब्रिटिशराज संपले म्हणून ही चित्रे पुन्हा न लावण्याचा विचार योग्य नाही. सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने ही चित्रे जपणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच ही चित्रे म्हणजे चित्रकलेचा उत्तम नमुना आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून ही चित्रे सभागृहात पुन्हा लावली जावीत, असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे.

मुख्य इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामासाठी ही चित्रे काढून ठेवण्यात आली. अद्यापही नूतनीकरणाचे काम सुरू आहे. ही चित्रे महत्त्वाची आहेत आणि ती खराब होऊ नयेत, यासाठी ती व्यवस्थित जपून ठेवली आहेत. शिवाजी सभागृहातील सहा चित्रांसह अन्य काही चित्रेही आहेत. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर ही चित्रे पुन्हा लावण्यात येतील.

डॉ. अरविंद शाळीग्राम, कुलसचिव, पुणे विद्यापीठ