पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी बंदला हिंसक स्वरूप मिळाले. यामध्ये सहा बसच्या काचा फोडण्यात आल्या तर तीन बसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. यामध्ये ४५ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती पीएपपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली.

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये देशभरात विरोधक रस्त्यावर उतरले होते. तर राज्यातील अनेक भागात हिंसक स्वरूपाच्या घटना घडल्या. राज्यातील अनेक भागात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी बसच्या काचा फोडण्याच्या घटना घडल्या. पुणे शहरात देखील बंदला हिंसक वळण मिळाल्याचे पाहावयास मिळाले. सहा बसच्या काचा फोडल्या तर तीन बसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. यामध्ये ४५ हजारांचे नुकसान झाले.

पुणे शहरातील मार्केटयार्ड १० नंबर प्रवेशद्वारे, चित्रशाळा, पंपिंग स्टेशन, नळस्टॉप, गुजरात कॉलनी, महानगरपालिका, संघर्ष चौक आदी ठिकाणी बसचे नुकसान करण्यात आले. यामध्ये बसच्या काचांचे नुकसान झाले असून न. ता. वाडी येथील पंपिंग स्टेशनसमोर चालकाला किरकोळ दुखापत झाली. पीएमपीच्या दैनंदिन उत्पन्नावरही चांगलाच परिणाम झाल्याचे सांगण्यात आले.