पुण्यातील कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील वडगाव पुलाजवळ भरधाव डंपरने गुरुवारी सकाळी दुचाकी, चारचाकी वाहने आणि खासगी प्रवासी बस यांना धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सहा जण मृत्युमुखी पडले. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. डंपरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
बाह्यवळण मार्गावरून देहूरोडच्या दिशेने जाताना वडगाव पुलाआधी डंपरने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. एका प्रवासी बसला धडक दिल्यानंतर डंपर पुलाजवळ असलेल्या सिंहगड रस्त्यावर कोसळला. डंपरच्या धडकेमुळे दोन झाडेही उन्मळून पडली आहेत. डंपरचा वेग जास्त असल्यामुळे अनेक गाड्यांना त्याची धडक बसली. एक सहा आसनी रिक्षा या अपघातात पलटी झाली आहे. खासगी प्रवासी बसला डंपरची धडक बसल्यामुळे ती झाडावर जाऊन आदळली. अवघ्या काही मिनिटांमध्ये डंपरने रस्त्यात असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर घटनास्थळी वाहनांची मोठी कोंडी झाली होती. पोलीसांनी दोन क्रेनच्या साह्याने डंपर आणि प्रवासी बस बाजूला काढली. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.