पुण्याहून गणपतीपुळ्याला देवदर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांची मोटार झाडावर आदळून सहाजण ठार झाले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील तळवडे येथे शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन कुटुंबांतील दोन बालके, तीन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. अपघातामधील मृत हे पुण्यामधील शेवाळेवाडी, हडपसर येथील रहिवासी आहेत.

संतोष त्र्यंबक राऊत (वय ३७) त्यांची पत्नी स्नेहल (३२) आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा स्वानंद, दीपक बुधाजी शेळकंदे (४०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा प्रणव तसेच मोटारचालक प्रशांत सदाशिव पाटणकर (४०) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. दीपक यांच्या पत्नी वरुणा (४०) आणि मुलगी यज्ञा (३) यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.

राऊत आणि शेळकंदे परिवारातील आठजण पुणे येथून मोटारीने देवदर्शनासाठी निघाले होते. शाहूवाडी तालुक्यातील तळवडे वळणावर चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने ती झाडावर आदळली. अपघातात तिघे जागीच ठार झाले तर दोन्ही मुलांचा मलकापूर येथील रुग्णालयात तर चालक पाटणकर यांचा कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिळकंदे कुंटुब मूळचे जुन्नरमधील भिवडी गावचे असून ते दहा वर्षांपूर्वी ते नोकरीसाठी पुण्यात स्थायिक झाले होते तर राऊत मूळचे लातूरचे आहेत.

डम्पर आणि मोटारीच्या भीषण अपघातात चारजण ठार

वडखळनजीक खारपाले गावाजवळ डम्पर आणि मोटारीच्या भीषण अपघातात शनिवारी चारजण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की खेळण्यातल्या गाडीप्रमाणे ही गाडी डम्परखाली भरडली गेली होती. जोडून आलेल्या सुट्टय़ांसाठी धार्मिक आणि पर्यटनस्थळी गर्दीचा ओघ वाढला असतानाच या अपघातांनी गालबोट लागले आहे. मुंबई- गोवा महामार्गावर शनिवारी संध्याकाळी भरधाव डम्पर आणि मोटारीच्या भीषण अपघातात गाडीतील चौघे जागीच ठार झाले . वडखळ नजीक खारपाले गावाजवळ हा अपघात सायंकाळी सहाच्या सुमारास झाला.

धडकेनंतर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला शेतात फेकली गेली होती. ही गाडी डम्परखाली अक्षरश: चिरडली गेली होती. या अपघातात चंद्रकांत चितळकर, सिंधू चितळकर, अजय चितळकर (सर्व राहणार खांब, रोहा) आणि रविकांत रा. सुर्वे (रा. अंधेरी) हे चौघे मृत्युमुखी पडले असून त्यांच्या वयाची माहिती समजलेली नाही. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.