पुणे जिल्ह्य़ातील एकोणऐंशी अतिरिक्त शिक्षक आणि कर्मचारी तब्बल सहा महिने वेतनापासून वंचित असून याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक  शाळेतील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे सोमवारी (२३ डिसेंबर) आंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्य़ात ७९ शिक्षक आणि कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. यातील ५९ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे समायोजन झालेले नाही, तर वीस शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे समायोजन होऊनसुद्धा त्यांना शाळांनी रूजू करून घेतलेले नाही. या शिक्षकांना गेले सहा महिने म्हणजे जुलै महिन्यापासून वेतनच देण्यात आलेले नाही. गणपती, दिवाळी सगळे सण उलटून गेले तरी शिक्षकांना वेतन मिळालेले नाही. ‘एकच व्यक्ती कमावती असलेल्या घरांमध्ये सहा महिने वेतन न मिळाल्यामुळे अडचणी येत आहेत. शिक्षक शाळेच्या वेळामध्ये शाळेत असल्यामुळे दुसरा कोणताही उद्योग करता येणे शक्य नाही. नोकरीच्या दरम्यान घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्याचीही अडचण होत आहे,’ असे शिक्षकांनी सांगितले.
खासगी शाळांमधील शिक्षकांचे वेतनही शालार्थ प्रणालीच्या माध्यमातून होते. मात्र, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची नोंदणीच या प्रणालीमध्ये होत नाही, त्यामुळे या शिक्षकांचे वेतन निघण्यामध्ये अडचणी उद्भवत आहेत, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन हे शालार्थ प्रणालीद्वारे न देता पूर्वीप्रमाणे शाळेतून देण्यात यावे. मात्र, या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांनाही वेळेतच वेतन दिले जावे, अशी मागणी महासंघाने केली आहे. याबाबत आंदोलन करण्याचा निर्णय महासंघाने घेतला असून सोमवारी शिक्षण संचालनालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, असे महासंघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सांगितले.