९.६६ टीएमसी पाणी

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये संततधार सुरू आहे. सध्या धरणांमध्ये शहराला सहा महिने पुरेल  एवढा पाणीसाठा झाला आहे. सध्या चारही धरणांमध्ये एकूण ९.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी जमा झाले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळपर्यंत खडकवासला धरण ८३ टक्के भरले. या धरणक्षेत्रांत रात्रभर दमदार पाऊस झाल्यास खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांतील पाणीसाठा मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८.०७ टीएमसी होता. दिवसभर संततधार सुरू असल्याने धरणांमधील पाणीसाठा ९.६६ टीएमसीवर पोहोचला आहे. शहराला दरमहा सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज असते. त्यामुळे सध्या शहराला सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये झाला आहे. टेमघर धरणात पावसाने दिवसभर हजेरी लावली. दिवसभरात या धरणक्षेत्रांत २५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. वरसगाव धरण क्षेत्रात १६ मि.मी. पाऊस झाला. तर, पानशेत धरण परिसरात १३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात मुसळधार पाऊस सुरू आहे. या धरण परिसरात ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

‘खडकवासला धरणात सध्या १.६३ टीएमसी म्हणजेच ८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास हे धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे’, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये अधिक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी ९ जुलैपर्यंत चारही धरणांत ८.५१ टीएमसी पाणीसाठा होता.

दरम्यान, जिल्ह्य़ातील अन्य महत्त्वाच्या धरणांपैकी गुंजवणी धरण क्षेत्रात १३९ मि.मी., नीरा देवघरमध्ये ११४ मि. मी. पाऊस पडला. तर, पिंपळगाव जोगे, डिंभे, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, भाटघर या धरणांच्या परिसरात दिवसभर पाऊस सुरू होता. उजनी धरणात दिवसभरात केवळ चार मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सध्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा उणे २७.९४ आहे.

धरणांमधील पाणीसाठा टीएमसी आणि कंसात टक्क्य़ांमध्ये – टेमघर ०.४५ (१२.१५), वरसगाव ३.४६ (२७.००), पानशेत ४.१२ (३८.६७), खडकवासला १.६३ (८२.७६), पवना २.४६ (८.९३), डिंभे २.१२ (१६.९४), भामा आसखेड  १.९९ (२५.९७), चासकमान १.६२ (२१.३६), गुंजवणी १.२७ (३४.५५), भाटघर ६.२२ (२६.४९), उजनी २७.९४ (-५२.१४).