पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेसह नऊ जणांविरोधात तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणूक काढल्याप्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे समजताच आरोपी साथीदारासह गजानन मारणे फरार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता त्या सर्व फरार आरोपींच्या शोधासाठी सहा पथके रवाना करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सांगितले.
तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजानन मारणे याने मिरवणूक काढली. या मिरवणुकीच्या व्हिडिओबद्दल राज्यात एकच चर्चा झाली होती. त्यावर पोलिसांनी कारवाई करीत करोनाबाबतचे नियम धुडकावणे, दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे गुन्हे कोथरूड, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, खारघर या पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहेत. कोथरूडमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. पण आता वारजे पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने गजानन मारणे हा त्याच्या नऊ साथीदारांसह फरार झाला आहे, असे वारजे पोलिसांकडून अधिकृत पत्रक काढून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे गजानन मारणेच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजानन मारणेने थेट पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढत करोना काळात लागू असलेल्या नियमांचे खुलेआम उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्यासह एकूण ९ जणांना पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी अटक केली. त्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मारणेसह ९ जणांना प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. पण वारजे पोलीस स्थानकात देखील त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच तो त्याच्या साथीदारांसह फरार झाला आहे. यासंदर्भात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीनं अडचणी निर्माण करणारं कोणीही असो मग ती राजकीय क्षेत्रातील असेल, गुंडगिरी करणारी, किंवा टोप्या घालणारी असेल…कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांसाठी नियम लावले गेले पाहिजे. सर्वांनी चौकटीत राहूनच आपलं काम केलं पाहिजे’, अशी प्रतिक्रिया दिली होती.
हेही वाचा – गुंड गजानन मारणेच्या ‘त्या’ मिरवणुकीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 7:44 pm