पुणे : मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या पुणेस्थित कंपनीतर्फे करोना चाचणीसाठी लागणारे किट सहा आठवडय़ांच्या विक्रमी कालावधीत तयार करण्यात आले आहे.

मायलॅब पॅथो डिटेक्ट कोविड – १९ क्वालिटेटिव्ह पीसीआर किट  हे मेक इन इंडिया उत्पादन इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) कोविड १९ च्या चाचणीसाठी असणारे सर्व निकष १०० टक्के पूर्ण करते. या स्वदेशी किटला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (सीडीएससीओ) व्यावसायिक उत्पादनासाठी मंजुरी  दिली आहे. कंपनीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मेक इन इंडियाचा अवलंब करत जागतिक आरोग्य संघटना आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यंत कमी कालावधीत हे किट तयार करण्यात आले आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक शैलेंद्र कवाडे म्हणाले, चाचणी किटच्या रूपाने सध्याचे अद्ययावत तंत्रज्ञान देशाला स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील होतो. हे किट अत्यंत संवेदनशील असणाऱ्या पीसीआर तंत्रावर आधारित आहे. प्राथमिक अवस्थेतही करोना संसर्गाचे निदान होऊ शकते. किटमुळे कमी वेळेत अचूक निदान होत आहे.

अडीच तासांत चाचणी

सध्या भारतात जर्मनीतून करोनाचे चाचणी किट लाखोंच्या संख्येने आयात करण्यात येत आहेत. मात्र, सद्य:स्थितीतील आणीबाणी पाहता आयात होणाऱ्या किटचा पुरवठा कधीही थांबू शकतो. त्यात मायलॅबतर्फे तयार करण्यात आलेली किट उपयुक्त ठरणार आहेत. मायलॅबच्या एका किट मधून १०० रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी शक्य असून आठवडय़ाला एक लाख किटचे उत्पादन करून देणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. सध्या उपलब्ध असणाऱ्या किटच्या तुलनेत या किटची किंमत एक चतुर्थाश असून चाचणीचे निष्कर्ष साधारणपणे अडीच तासांत हातात येतात.