शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे बोअरवेलमधील खड्डय़ात पडलेल्या त्या सहा वर्षांच्या बालकाची गेली सत्तावीस तास मृत्यूशी झुंज सुरू होती. ‘आई-वडीलव आजीकडे मला वाचवा’ असा आक्रोश करणाऱ्या बालकाला बचावपथकातील अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून बाहेर काढले. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच होते. ससून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुनील हरिदास मोरे (वय ६) असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. मोरे कुटुंबीय मूळचे जामखेड तालुक्यातील पाटोदा-गरड या गावचे रहिवाशी आहेत. मोरे कुटुंबीय मांडवगण फराटा येथील राजाराम शितोळे यांच्या शेतात मजुरी करतात. शनिवारी (३० एप्रिल) दुपारी सुनील हा मित्रांसोबत शेतात खेळत होता. तेथून काही अंतरावर त्याची आजी काम करत होती. बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्डय़ात तो अचानक पडला. सुमारे वीस फूट खोल असलेल्या खड्डय़ात तो पडल्यानंतर त्याच्या मित्रांनी या घटनेची माहिती काही अंतरावर असलेल्या आजीला दिली. त्यानंतर घाबरलेल्या मोरे कुटुंबीयांनी तेथील ग्रामस्थांना ही माहिती दिली. पुणे अग्निशमन दलाला ही माहिती मिळाल्यानंतर जवानांच्या पथकाने तेथे धाव घेतली आणि मदत कार्यास सुरुवात केली.
दरम्यान राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक तेथे दाखल झाले. संयुक्त प्रयत्नांतून सुनील याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. दरम्यान खोदकामात त्याच्या छातीसमोर मोठा दगड असल्याचे निदर्शनास आले तसेच त्याचे हात-पाय एकमेकात गुंतल्याचे लक्षात आल्याने काळजीपूर्वक खोदकाम सुरू करण्यात आले. त्याची प्रकृती खालावत चालली असल्याने डॉक्टरांच्या पथकाने पाईपचा वापर करून खड्डय़ात सलाईनद्वारे औषधे देण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळपासून त्याने काहीच खाल्ले नसल्याने त्याची हालचाल मंदावली होती. त्यामुळे त्याचा आवाजदेखील क्षीण झाला होता. अखेर रविवारी सायंकाळी सुनील याला शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्याला तातडीने ससून रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सुनीलचा मृत्यू झाला. ही माहिती समजताच शिरूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.