भारत, इंग्लड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को, मॉरेटानिया आणि नायजर अशा आठ देशांत मिळून बारा हजार किलोमीटर अनवाणी चालण्याचे धाडस करणाऱ्या पॉला कॉन्स्टंट या ऑस्ट्रेलियन लेखिकेच्या प्रवासाचा थरार शब्दबद्ध झाला आहे.
‘स्लो जर्नी साऊथ’ आणि ‘सहारा’ या दोन पुस्तकांच्या माध्यमातून या पदयात्रेचे अनुभव वाचकांसमोर येणार आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता या दोन इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पॉला प्रथमच पुण्यात येणार आहेत. या इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद ऑक्टोबपर्यंत प्रकाशित करण्याचा मनोदय असल्याची माहिती सुनील मेहता यांनी दिली. प्रकाशन कार्यक्रमानंतर गोबी वाळवंट पार केलेल्या सुचेता कडेठाणकर आणि प्रवासवर्णनाविषयी ब्लॉगलेखन करणाऱ्या अनुराधा गोयल श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.
बहुचर्चित ‘प्लेईंग इट माय वे’ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद सचिनच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २४ एप्रिल रोजी प्रकाशित होत असल्याची माहिती मेहता यांनी दिली. दीपक कुलकर्णी या मराठी पुस्तकाचा अनुवाद करीत आहेत. पुस्तक प्रकाशनासाठी सचिन तेंडुलकर याला निमंत्रित करण्यात आले असून कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि मुंबई या शहरांमध्ये हा प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.