साम, दाम, दंड, भेद अशा कोणत्याही नीतीचा वापर करून निवडणूकजिंकायचीच, असे ध्येय ठेवून पिंपरीतील राजकीय पक्ष आणि उमेदवार कामाला लागले आहेत. प्रत्येक भागातील वजनदार घटकास आपलेसे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांनी झोपडपट्टीतील एकगठ्ठा मते आपल्याकडे खेचण्यासाठी झोपडपट्टी दादांचाही आधार घेतला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत अशा झोपडपट्टी दादांचा भाव वाढल्याचे दिसत आहे.

िपपरी-चिंचवड शहरात ७२ झोपडपट्टय़ा आहेत. काही छोटय़ा तर काही मोठय़ा झोपडपट्टय़ा आहेत. काही घोषित आहेत तर काही अनधिकृतपणे वसलेल्या आहेत. मात्र, या दाट झोपडपट्टय़ांमध्ये मोठय़ा संख्येने मतदार वास्तव्यास आहे. राजकीय पक्षांच्या म्हणण्यानुसार दोन लाखापर्यंतचा मतदार असावा. या मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचे अनेक प्रयत्न राज्यकर्त्यांकडून सुरू आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प असो की अन्य काही सुविधा देण्याचे आश्वासन असो, त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. मात्र, त्याही पुढे जाऊन त्या त्या भागात वजनदार असलेला झोपडपट्टी दादा आपल्याकडे खेचून त्याच्या प्रभावाचा वापर मतदानासाठी करून घेण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळेच की काय, शहरातील जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या नेत्याकडे अशा झोपडपट्टी दादांचा राबता असतो. पोलीस व शासकीय यंत्रणेपासून यांना संरक्षण दिल्यास ते निवडणुकांच्या कामासाठी हवी ती मदत करण्यास तत्पर असतात.

आतापर्यंतच्या प्रत्येक महत्त्वाच्या निवडणुकीत अशा झोपडपट्टी दादांनी मतांची ‘गोळाबेरीज’ करण्याची कामगिरी बजावली आहे. झोपडपट्टी दादांना आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार वाटत होता. आता हीच मंडळी भाजपचा जयघोष करताना दिसत आहेत. गृहखात्याचा प्रभाव असेल किंवा दादा मंडळींना पाठबळ देणाऱ्यांनीच भाजपची निवड केली असेल, दोन्हीही शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, गुंडगिरीची ही साखळी राजकीय नेत्यांच्या दारापर्यंत पोहोचलेली असते आणि सर्वकाही माहिती असूनही पोलीस यंत्रणा ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवून असते.