News Flash

तीन प्लंबर, साठ नळ.. वाचले लाखो लिटर पाणी

झोपडपट्टय़ांमध्ये पाणी भरून ठेवण्यासाठीची साधने नसल्यामुळे जेवढे लागेल तेवढे पाणी भरून ठेवले जाते आणि उर्वरित पाणी नळी लावून रस्त्यावर वा नाल्यात सोडून दिले जाते.

| July 9, 2014 03:25 am

शहरातील शेकडो झोपडपट्टय़ांमध्ये घराघरांमध्ये पाण्यासाठी नळजोड देण्यात आलेले असले, तरी या जोडांवर नळ नसल्यामुळे रोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे मंगळवारी एका उपक्रमाच्या निमित्ताने उघड झाले. कात्रज परिसरातील तीन झोपडपटय़ांमध्ये अचानक केलेल्या तपासणीत बहुसंख्य घरांमध्ये नळ नसल्यामुळे फार मोठय़ा प्रमाणावर पाणी वाया जात होते आणि या सर्व ठिकाणी नळ बसवून वाया जाणारे पाणी थांबवण्यात आले.
धरणांच्या पाणीसाठय़ात कमालीची घट झाल्यामुळे शहरात पाणीकपात लागू करण्यात आली असून संपूर्ण शहराला सध्या एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, अशाही परिस्थितीत झोपडपट्टय़ांमध्ये घराघरांमध्ये जे नळजोड देण्यात आले आहेत त्या जोडांवर नळ नसल्यामुळे पाणी मोठय़ा प्रमाणावर वाया जात आहे. झोपडपट्टय़ांमध्ये पाणी भरून ठेवण्यासाठीची साधने नसल्यामुळे जेवढे लागेल तेवढे पाणी भरून ठेवले जाते आणि उर्वरित पाणी नळी लावून रस्त्यावर वा नाल्यात सोडून दिले जाते. हजारो घरांमध्ये असा प्रकार होत असतो. मात्र वारंवार तक्रारी करूनही महापालिकेतर्फे पाण्याच्या या अपव्ययाबाबत कारवाई केली जात नाही. त्यामुळे कात्रज प्रभागाचे नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेता वसंत मोरे यांनी मंगळवारी सकाळीच त्यांच्या प्रभागात घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली.
प्रभागात सकाळी सहापासूनच मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते घराघरांमध्ये जात होते आणि त्यांना प्रत्येक घरात पाण्याचा मोठा अपव्यय पहायला मिळत होता. त्यामुळे केवळ पाहणी करूनच हे कार्यकर्ते थांबले नाहीत. कार्यकत्यांनी बरोबर तीन प्लंबर आणि पन्नास ते साठ नळही (तोटय़ा) नेले होते. नवीन कात्रज वसाहत येथे प्रत्येक घरात जाऊन पाहणी करण्यात आली आणि ज्या ज्या घरांमध्ये नळजोडावर तोटी नव्हती तेथे तोटी बसवून देण्यात आली. या घरांमध्ये पाणी भरून ठेवण्यात आले होते आणि महापालिकेतर्फे येणारे पाणी रबरी नळी लावून शेजारीपाजारी सोडून दिले जात होते. या वसाहतीमध्ये पाहणी करत असतानाच प्लंबरनी साठ घरांमध्ये तोटय़ा बसवल्या आणि वाया जाणारे पाणी थांबवले.

नागरिकांकडून होणारा पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी ज्या घरांमधील नळजोडांवर तोटय़ा नाहीत अशा घरांमध्ये तोटय़ा बसवण्याची मोहीम आम्ही सुरू केली आहे. पहिल्याच दिवशीच्या अचानक केलेल्या तपासणीत बहुतेक घरांमधून पाणी मोठय़ा प्रमाणावर वाया जात असल्याचे दिसले. आम्ही पाहणी करूनच थांबणार नाही, तर सर्व घरांमध्ये तोटय़ाही बसवून देत आहोत.
वसंत मोरे, नगरसेवक, प्रभाग क्रमांक ७६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2014 3:25 am

Web Title: slum area water mns wastage
टॅग : Mns,Slum Area
Next Stories
1 पुण्यासाठी दोन नव्या गाडय़ा अन् पायाभूत सुविधांवर भर
2 एक सत्कार असाही!
3 चांगलं माणूस होणं हाच माझ्या लेखनाचा आंतरिक ध्यास – कवयित्री आसावरी काकडे
Just Now!
X