सिलिंडर स्फोटामुळे घबराट; दोन तासांनंतर आग आटोक्यात

मार्केट यार्ड भागातील डॉ. आंबेडकर वसाहतीत शनिवारी सकाळी लागलेल्या आगीत ७३ झोपडय़ा जळून खाक झाल्या. एकपाठोपाठ झोपडय़ा जळाल्याने रहिवासी भयभीत झाले. गृहोपयोगी साहित्य, मौल्यवान चीजवस्तू घेऊन रहिवासी बाहेर पळाल्याने गोंधळ उडाला. काही झोपडय़ांमधील स्वयंपाकाचे सिलिंडर फुटल्याने आग भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी एकच्या सुमारास आग आटोक्यात आणली. आगीत ७३ झोपडय़ा जळून भस्मसात झाल्या असून आगीमागचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

मार्केट यार्ड भागात डॉ. आंबेडकर वसाहत आहे. दाट वस्तीचा हा भाग असून एकमेकांना लागून तेथे झोपडय़ा आहे. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका झोपडीत आग लागली. त्यानंतर एकपाठोपाठ तेथे असलेल्या झोपडय़ांना आग लागली. आग लागल्यानंतर भयभीत झालेले रहिवासी बाहेर पळाले. गृहोपयोगी साहित्य, मौल्यवान चीजवस्तू घेऊन बाहेर पडलेल्या रहिवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला कळविण्यात आली. तीन झोपडय़ांमधील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या स्फोट झाल्याने आग भडकली. अग्निशमन दलाचे पंधरा बंब, तीन टँकर, दहा ते बारा खासगी टँकर, तीन जेसीबी यंत्र, दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी सुनील गिलबिले, सहायक विभागीय अधिकारी रमेश गांगड,  केंद्रप्रमुख प्रकाश गोरे, संजय रामटेके, प्रभाकर उमराटकर, विजय भिलारे, शिवाजी चव्हाण साठ ते सत्तर जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वसाहतीत काही तीन मजली इमारती आहेत. या इमारतीच्या छतांवरून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. झोपडय़ांमधील लाकडी सामान, पत्रे तसेच वस्तू पेटल्याने मोठय़ा प्रमाणावर धूर झाला होता. अग्निशमन दलाचे जवान रौफ शेख यांच्या नाका-तोंडात धूर शिरल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार करून शेख यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. दुपारी एकच्या सुमारास आग आटोक्यात आली. त्यानंतर धुमसणाऱ्या आगीवर पाण्याचा मारा करण्यात येत होता. आग पुन्हा भडकण्याची शक्यता गृहीत धरून अग्निशमन दलाचे जवान तेथे थांबून होते. दरम्यान, आंबेडकर वसाहतीतील अरुंद रस्त्यांवरून पळणारे नागरिक, बघ्यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे आले. पोलिसांनी नागरिकांना बाजूला जाण्याच्या सूचना दिल्या.

अनेकांना अश्रू अनावर

डोळ्यादेखत झोपडय़ा तसेच गृहोपयोगी साहित्य पेटल्याने रहिवाशांना अश्रू अनावर झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन ते अडीच तासांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली.मात्र, अनेकांचे गृहापयोगी साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांची कसरत

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तसेच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी गणेश पेठेतील पांगुळ आळी परिसरात असलेल्या दुकानाला आग लागली. व्यापारी पेठेत आग लागल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे धाव घेतली.  जवानांनी गणेश पेठेतील आग आटोक्यात आणली. मात्र, एकाच वेळी दोन आगीच्या घटनांवर काम करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली.