पिंपरी-चिंचवड शहरातील लघुउद्योजकांची व्यथा

पिंपरी : आधीच्या टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीतून अद्याप बाहेर पडलो नाही. त्यामुळे पुन्हा टाळेबंदी नकोच. गेल्यावेळी सहन केलेल्या यातना पुन्हा सहन करण्याची ताकद आमच्यात राहिलेली नाही, अशी व्यथा पिंपरी-चिंचवड शहरातील लघुउद्योजकांनी व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत टाळेबंदी हा उपाय असूच शकत नाही, अशी भूमिकाही त्यांनी ठामपणे मांडली.

करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर गेल्या वर्षी टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे आम्हा लघुउद्योजकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. काम ठप्प झाले, उत्पन्नाचे मार्ग बंद झाले. कर्जाचे हप्ते वाढले. मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली, अशी अनेक संकटे आली. त्यातून हळूहळू सावरत असतानाच पुन्हा टाळेबंदी लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने लघुउद्योजक हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे शहराध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले, की कोणत्याही परिस्थितीत टाळेबंदी लागू करणे, हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने कोणी विचारही करता कामा नये. संघटनेचे पदाधिकारी प्रमोद राणे म्हणाले, की  गेल्या वर्षीच्या टाळेबंदीमुळे लघुउद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. आताही अडचणींचा डोंगर आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत, कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. विजेचे दर वाढले असून अखंड वीजपुरवठा मात्र होत नाही. अशाप्रकारच्या यातना आम्ही उद्योजक भोगतो आहोत. पुन्हा टाळेबंदी झाल्यास काय होईल, याची धास्ती आहे. पुन्हा अशा यातना भोगण्याची ताकद राहिलेली नाही. टाळेबंदी हा कदापि पर्याय राहिलेला नाही. उद्योजक संदीप निलख म्हणाले,की कामगारांवर उपासमारीची किंवा पुन्हा गावाकडे जाण्याची वेळ येऊ नये. त्यामुळेच टाळेबंदी करणे चुकीचे ठरेल.