‘‘लहान ‘रीटेल’ व्यावसायिकांसमोर मोठमोठी दुकाने, ‘ब्रँडेड’ दुकाने, ‘मॉल’, ‘ई-कॉमर्स’, घरपोच सेवा ही आव्हाने आहेत. त्यांचा सामना करताना काही दुकाने, ‘ब्रँड’ पुसले गेले. असे का झाले असावे याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून कारणे शोधल्यास इतर लहान व्यावसायिकांना फायदा होईल. व्यवसायवृद्धीबरोबरच ग्राहकाशी आपुलकी टिकवणेही गरजेचे आहे,’’ असे मत ज्येष्ठ उद्योजक व ‘प्राज इंडस्ट्रीज’चे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.
‘स्टेशनरी, कटलरी अँड जनरल र्मचट्स असोसिएशन’तर्फे ‘व्यापारी एकता दिना’च्या निमित्ताने ‘कॉटन किंग’ या फर्मचे प्रदीप मराठे व शुभदा मराठे यांना उद्योजक प्रमोद चौधरी यांच्या हस्ते सोमवारी ‘व्यापार भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
‘क्रिसिलिस ग्रुप’चे अध्यक्ष मनीष गुप्ता, अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे, असोसिएशनचे अध्यक्ष राजेश गांधी, मदनसिंह राजपूत, शिरीष बोधनी, अरविंद पटवर्धन, मेधा साने या वेळी उपस्थित होते. ‘अभय ट्रेडर्स व सिटी मेगा स्टोअर्स’चे अभय ललवाणी यांना या वेळी ‘उत्कृष्ट दुकान पुरस्कार’, ‘पावगी आणि पावगी’ फर्मचे विनायक पावगी यांना ‘उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार’, ‘डी. प्रमोद मॅन्यू. कंपनी’चे अनिल व प्रमोद डुशी यांना ‘फिनिक्स पुरस्कार’ आणि ‘काणे फूड्स’च्या मंजिरी काणे यांना ‘कै. साधनाताई गोरे पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
चौधरी म्हणाले,‘‘पाश्चिमात्य देशांमध्ये ‘मॉम अँड पॉप स्टोअर’ अशी संकल्पना आहे. गिऱ्हाईकांशी पिढय़ान्पिढय़ा नाते जोडत हे ‘रीटेल’ व्यावसायिक व्यवसाय करतात. आपल्याकडील रीटेल व्यावसायिकदेखील याचप्रकारे ग्राहकांचा विश्वास व प्रेम संपादन करतात. आपण उपेक्षित वा दुर्लक्षित आहोत हा विचार या व्यावसायिकांनी डोक्यातून काढून टाकायला हवा. ‘डीपार्टमेंटल स्टोअर’ किंवा ‘मॉल’मधील व्यवसायाला चेहरा नसतो, तर दुकानांच्या व्यवसायात प्रेमाचा ओलावा असतो.’’