29 May 2020

News Flash

स्मार्ट सिटी अभियानात पुण्याची प्रवेशिका सादर करण्यासाठी मंजुरी

स्मार्ट सिटी अभियानात पुणे शहराची निवड व्हावी यासाठी आवश्यक प्रवेशिका केंद्राला सादर करण्यास स्थायी समितीने महापालिका प्रशासनाला अनुमती दिली.

| July 8, 2015 03:20 am

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात पुणे शहराची निवड व्हावी यासाठी महापालिकेला प्रवेशिका सादर करावी लागणार असून आवश्यक प्रवेशिका केंद्राला सादर करण्यास स्थायी समितीने मंगळवारी महापालिका प्रशासनाला अनुमती दिली.
लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच स्वच्छ व शाश्वत विकासाची शहरे तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानाची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी अभियानासाठीच्या प्रवेशिका १० जुलैपर्यंत सादर करायच्या असून त्या अनुषंगाने महापालिकेत तयारी सुरू आहे. स्मार्ट सिटी अभियानात सहभागी होण्यासाठी राज्यातील ४३ महापालिका व नगरपालिकांकडून केंद्राने प्रवेशिका मागवल्या आहेत. तेरा विविध मुद्यांवरील महापालिकेच्या सद्यस्थितीचे अहवाल असे या प्रवेशिकेचे स्वरुप आहे. या अहवालांच्या आधारे स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील दहा शहरांची निवड केली जाईल. केंद्र शासनाच्या निकषांनुसार राज्यातील दहा शहरांची निवड करून त्या शहरांची नावे राज्य शासनाने केंद्राला ३० जुलैपर्यंत कळवणे आवश्यक आहे.
लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा व वीजपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, शिक्षण, गरिबांसाठीची घरे, ई गव्हर्नन्स, पर्यावरण, महिला, मुले व ज्येष्ठांची सुरक्षितता आदींबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या योजना, त्या बाबतच्या विस्तारीकरण योजना आणि भविष्यातील वाटचाल या संबंधीचे जे धोरण स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आखण्यात आले आहे त्याची दखल केंद्राकडून घेतली जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, उत्पन्नाचा आलेख, लेखा परीक्षणाचा अहवाल, वसुली, भांडवली कामांसाठी निधीची उपलब्धता, नेहरू योजनेत झालेल्या कामांचा आढावा, स्वच्छ भारत अभियानातील नागरिकांचा सहभाग याचाही अहवाल प्रवेशिकेच्या माध्यमातून सादर करायचा आहे. आर्थिक क्षमता आणि योजना राबवणारे शहर ही स्मार्ट सिटी योजनेसाठीची प्रमुख कसोटी असेल.
स्मार्ट सिटीसाठी जी प्रवेशिका केंद्राला सादर करायची आहे त्यासाठी स्थायी समितीपुढे महापालिका प्रशासनाने प्रस्ताव आणला होता. त्यानुसार प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी एकमताने मंजुरी दिली. बैठकीत आयत्यावेळी हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि तो मंजूरही करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2015 3:20 am

Web Title: smart city
टॅग Smart City
Next Stories
1 लाचखोरांवरील कारवाईत पुणे विभाग अव्वल
2 विद्यार्थी पासच्या मागणीसाठी शिवसेनेचा महापालिकेवर मोर्चा
3 डेंग्यूची पूर्वसूचना!
Just Now!
X