केंद्र सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी योजनेत समावेश होण्यासाठी राज्यभरातील शहरांमध्ये स्पर्धा राहणार असून त्यात प्रवेश मिळवण्यासाठी महापालिकांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या स्पर्धेत िपपरी-चिंचवडने सहभागी व्हावे, यासाठी मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या ७ जुलैच्या बैठकीत मांडण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ‘स्मार्ट सिटी’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात स्पर्धात्मक पध्दतीने राज्यातील १० शहरे निवडण्यात येणार आहेत. त्या शहरांची शिफारस केंद्राकडे करण्यात येणार आहे, यासाठी काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार, स्वच्छ भारत अभियान आधाररेखानुसार वैयक्तिक शौचालय उपलब्ध करणे, ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीमार्फत कार्यवाहीची माहिती तक्रारदारास देणे, मासिक ई वार्तापत्र प्रसिध्द करणे, प्रकल्पनिहाय गेल्या दोन वर्षांतील पालिकेचे अंदाजपत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द करणे, सेवा देण्यास निर्धारित वेळेपेक्षा जास्तीचा कालावधी झाल्यास दंडात्मक कार्यवाही करणे, २०१२ ते २०१५ या आर्थिक वर्षांतील आंतरिक उत्पन्नामध्ये प्रतिवर्षांतील वाढ, मागील महिन्यापर्यंतची कर्मचाऱ्यांचे पगार वाटप, लेखापरीक्षण, भांडवली खर्च, उत्पन्नातील योगदान टक्केवारी, पाणीपुरवठा आस्थापन व देखभाल खर्चाची टक्केवारी, ३१ मार्च २०१२ पर्यंत पूर्ण झालेले प्रकल्प आदी मुद्दय़ांवर १०० गुण राहणार आहेत.
या पाश्र्वभूमीवर, या स्पर्धेत सहभागी होण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. तेथे मान्यता मिळाल्यानंतर हा विषय सभेपुढे येणार आहे. िपपरी पालिकेमार्फत शहरात झालेले कामकाज, सेवा व पायाभूत सुविधांचा विचार करता ‘स्मार्ट सिटी’त िपपरीचा समावेश अभिमानास्पद राहणार आहे. या योजनेत सहभाग निश्चित झाल्यास पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा निधी शहरासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे, असे या प्रस्तावात म्हटले आहे.