स्मार्ट सिटी अभियानाबाबत नागरिकांच्या सूचना व मते नोंदवून घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे तेवीसशे जण काम करत असल्यामुळे महापालिकेच्या मुख्य भवनातील कार्यालयांसह क्षेत्रीय कार्यालयांमधील कामकाज ठप्प झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही कामाबाबत कोणाकडेही चौकशी केली की स्मार्ट सिटीच्या सर्वेक्षणात आहे, असे उत्तर अधिकारी व कर्मचारी देत असल्याच्या तक्रारी येत असून या प्रकाराबाबत स्थायी समितीच्या बैठकीतही सोमवारी सदस्यांनी अनेक तक्रारी केल्या.
स्मार्ट सिटी अभियानात शहरात कोणत्या सुधारणा व्हाव्यात याबाबत सध्या नागरिकांची मते व सूचना जाणून घेतल्या जात आहेत. त्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत असून या कामासाठी अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे तेवीसशे जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच ते सहा लाख नागरिकांकडून सूचना घेतल्या जाणार आहेत आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला अडीचशे जणांकडून सूचना घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महापालिकेच्या मुख्य खात्यांमधील तसेच क्षेत्रीय कार्यालयांमधील वर्ग दोन व तीनच्या कर्मचाऱ्यांकडे हे काम देण्यात आले असून हे सर्वजण सध्या सर्वेक्षण करत आहेत. त्यामुळे सध्या महापालिका कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी जागेवरच नाहीत अशी परिस्थिती झाली आहे. नागरिकांकडून या बाबत तक्रारी येत असून नगरसेवकांनाही हाच अनुभव येत आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मंगळवारी सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. महापालिका अंदाजपत्रकातील कामे सहा महिने होऊनही मार्गी लागलेली नाहीत. या कामांना गती देण्याचे नियोजन करण्याऐवजी सध्या माझ्याकडे स्मार्ट सिटी अभियानाचे काम आहे असे उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याची तक्रार या वेळी करण्यात आली. मोठय़ा संख्येने कर्मचारी व अधिकारी सर्वेक्षण करत असताना त्यांच्या कामाची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे या प्रश्नासह अनेक प्रश्न या वेळी  विचारण्यात आले. मात्र त्याबाबत प्रशासनाकडून खुलासा झाला नाही.
स्मार्ट सिटीबरोबरच दैनंदिन कामेही महत्त्वाची
स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृहनेता शंकर केमसे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांची विधान भवन येथे जाऊन मंगळवारी भेट घेतली. तेथे एका बैठकीत आयुक्त उपस्थित होते. शहरातील प्रलंबित कामांबाबत या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांबरोबर चर्चा केली, तसेच स्मार्ट सिटी अभियानामुळे दैनंदिन कामे रखडल्याची तक्रारही या वेळी करण्यात आली. स्मार्ट सिटी अभियानातील उपक्रमांबरोबरच नागरिकांची दैनंदिन कामे आणि शहरातील विकासकामेही झाली पाहिजेत ही कामेही महत्त्वाची आहेत, असे या वेळी सांगण्यात आले. स्वच्छतागृहांची दैनंदिन स्वच्छता, भित्तिपत्रकांनी होत असलेले शहराचे विद्रूपीकरण यासह शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांसंबंधीचे पत्रही वंदना चव्हाण यांनी या वेळी आयुक्तांना दिले आणि या प्रश्नांबाबत चर्चाही केली.